डॉक्टर; ‘रॉय’ल माणूस
पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारिता करीत असताना अनेक अधिकारी, राजकिय नेते यांच्याशी संवाद साधण्याचा, विविध कारणांनी संबंध आला…त्यात भावलेली व्यक्ती म्हणजेच महापालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल रॉय… एकदम ‘रॉय’ल माणूस…त्यांना कधी अधिकारी म्हणून पाहिलं नाही…किंवा बडेजाव, अहंकार दिसला नाही…आपल्याच जगात मस्त असलेला माणूस…
त्यांचा सहवास म्हणजे, एक तजेलदार गप्पाची मैफल…मनमुराद हसणं, व्यक्त होणं अफलातून…इतरांना नवी ऊर्जा देणारं…मग गप्पा राजकारणाच्या असोत की समाजकारण, वैद्यकीय क्षेत्रातील…कधी वेळ निघून जायचा कळत नसायचे…, त्यांच्याकडे किश्याचा खजिना आहे…
रॉय सरांचा आणखी एक गुण भावणारा कुण्याही पत्रकाराने विरोधात बातमी दिली म्हणून त्यांनी कधी अबोला धरलाय, असं ऐकिवात नाही… पत्रकार असो की राजकारणीही सर्वांशी स्नेहबंध जिव्हाळ्याचा…
माणूस म्हणूनही ग्रेटच…कुणाला काही मेडिकल अडचण आली तर सर अचूक मार्गदर्शन करतात…एकदम करेक्ट अनिलिसिस असतो…एक आठवण आवर्जून सांगावीशी वाटते. कोरोनाच्या पहिल्या लाटेतच मला घेरले आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला…पायाखालची वाळू सरकली… पत्रकार किती धैर्यशील असला तरी ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळतं… ज्यावेळी कोरोनाने हाहाकार माजविला होता…, त्यावेळी बेड मिळत नव्हते आणि दररोज कुणीतरी जवळचा मित्र नातेवाईक गेल्याची बातमी येत होती… सर्व काही मन भेदरविणारे…, त्यामुळे अनेक वाईट विचार मनाला शिवून जायचे…., भीतीदायक…. अशा काळात रॉय सरांनी वाढवलेले मनोबल, केलेलं अचूक निदान आणि मदत ही मी कधीही विसरणार नाही…
रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच मी सरांना फोन केला…त्यांनी मला काही तपासण्या करायला सांगितल्या. मी त्या केल्या. रिपोर्ट पाठविले… ते पाहून त्यांनी होम आयसोलेशन मध्ये राहण्याचा सल्ला दिला…आणि दहा दिवस दररोज माझ्याशी संवाद साधला… धीर दिला… आयसोलेशन वेळ संपताच ”बस्स झालं आता घराबाहेर पडा …’ असा सल्ला दिला…मी कोरोना मुक्त झालो…
सर आपण ग्रेटच…
कालच आपण महापालिका सेवेतून निवृत्त झालात…आता दुसऱ्या मजल्यावरील आपल्या केबिन मधील भेट होणार नाही, तेथील आपला फेमस कावा चहा…आणि हसून खिदळत रंगणारी मैफल होणार नाही…आम्ही त्यास मुकणार…
सर, पण आपणं वैद्यकीय मार्गदर्शन आणि फ्री क्लिनिक ही संकल्पना पुढेही सुरू ठेवावी, असं आम्हा मित्रांना वाटते…
तुम्ही वैद्यकीय डॉक्टर नाही तर मनाचे डॉक्टर आहात… अशाच व्यक्तीची या देशाला गरज आहे…
आपण महापालिका सेवेतून निवृत्त झाला आहात, पण आपल्यातील ऊर्जा निरंतर टिकणारी आहे…जोश आणि जल्लोष पूर्ण आपला स्वभाव कायम ठेवावा…
आपणांस पुढील आयुष्यास शुभेच्छा… निरामय आरोग्य आणि आपली अपूर्ण सर्व स्वप्न पूर्ण होवोत, ही सदिच्छा…असंच मनसोक्त जगत रहा…आपला सहवास आणि प्रेम कायम ठेवावे ही विनंती…
आपला सन्मित्र…
-डॉ विश्वास मोरे
Very true about Dr. Anil Roy. Very sincere,respond so quickly no need for second call.
LikeLiked by 1 person
Very true about Dr roy
LikeLiked by 1 person