This is his first part of a series of write ups on this topic.
नम्र आवाहन- 'शिवीगाळ एक चिंतन' ही
Dr Rajendra Karambelkar is my medical college batchmate and friend. Here is his fantastic writeup on Abusive language in Marathi. He is a well known pediatrician in PCMC , Pune, Maharashtra… India… Read and enjoy
मी लिहिलेली एक लेख मालिका आपल्याला पाठवत आहे.
- ही एक विनोदी लेख मालिका आहे. (तुम्हाला वाचताना तसं वाटलं नाही तरीपण) (!).
- कोणत्याही लेखात कोणत्याही (अर्वाच्य) शिव्या स्पष्ट पणे लिहिलेल्या नाहीत जेणेकरून कोणत्याही वाचकाला लेखाचा निस्संकोच पणे निर्भेळ आनंद घेता येईल.
- विषयाचे गांभीर्य ओळखून कोणाच्याही वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, जातीय, राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक, भौगोलिक, जैविक/लैंगिक (आणि शाळेत शिकलेल्या गणितीय, भौमितिक, नागरिक शास्त्र इ.सर्वविषयांच्या) बद्दलच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेवून ही लेख मालिका लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
- तरीपण चिंतनाचा हा प्रयत्न न आवडल्यास ही लेख मालिका न वाचता डिलिट करून मला क्षमा करावी.
धन्यवाद
डॉक्टर करंबेळकर राजेंद्र प.
शिवीगाळ एक चिंतन (भाग एक)
मी 'शिवीगाळ' या विषयावर काही ललित लेखन लिहायचा विचार करतोय हे मी माझ्या मित्राला जेव्हा सांगितलं तेव्हा त्याने एका क्षणाचाही विलंब न करता, माझ्या परमपूज्य आईची आठवण करुन देत मला म्हणाला..."च्यायला तुझ्या, हा काय विषय आहे का काही लिहिण्याचा ?"
त्याने माझ्या आईचा उद्धार केला त्याच क्षणी माझ्या लक्षात आलं की शिव्या हा विषय आपल्या सर्वांच्याच किती जिव्हाळ्याचा विषय आहे !
अर्थात मी पण त्याच्या आईची आठवण त्याच्या बरोबर बोलताना नेहमीच काढत असतो हे वेगळं सांगायची गरज नाही. यावरून इथे आणखीन एक गोष्ट स्पष्ट झाली. एकवेळ तुम्ही तुमच्या आईची जेवढी आठवण काढणार नाही तेव्हडी तिची आठवण आपले खरे मित्र मात्र काढत असतात. आईचंच काय पण कमी जास्त प्रमाणात आपल्या परमपूज्य पित्याचं (बापाचं) सुद्धा नाव काढलं जातं. एकमेकांवरचं प्रेम मनापासून व्यक्त करण्यासाठी एकमेकांच्या मातापित्यांचं सतत स्मरण करणारे असले अस्सल संस्कारी मित्र लाभणं हे सुद्धा एक परमभाग्य आहे. असो.
शिवीगाळ या विषयावर फार गहन (?) विचार केला तर बर्याच गमतीदार गोष्टी आपल्याला हळूहळू उलगडत जातील असं मला वाटतं. उदा. तुमचा विश्वास बसणार नाही पण 'शिवी' हा एक खाद्यपदार्थ आहे. चटणी सारखा तिखट. बरेचदा झणझणीत. क्षणात तयार करता येतो किंवा आपोआप तयार होतो. खाणाऱ्या व्यक्तीच्या 'कानावर' पडला तरीही तिखट लागतो जिभेवर स्पर्श व्हायची गरज नाही. कमी प्रमाणात पण पुरतो. गंमत म्हणजे सगळ्यांनाच 'वाढायला' आवडतो पण स्वतःला खायला मात्र नाही. पण त्याहून मोठी गंमत म्हणजे 'पोटभर' शिव्या घालणाऱ्याचं 'पोट' कधीच भरत नाही कारण तो स्वतः शिव्या 'खात'च नाही आणि जो शिव्या 'खातो' त्याचंही पोट भरत नाही. उलट त्याचं पित्त खवळतं कारण त्याला शिव्या 'पचत' नाहीत आणि त्यामुळे त्यालाही पोटभर शिव्या खाल्ल्याचं समाधान मिळत नाही !
दुसरं उदाहरण द्यायचं तर अभिनयाच्या दृष्टिकोनातून शिव्यांकडे पहा. आपल्या वेगवेगळ्या रसातील भावना, (इथे रस हा शब्द फळांच्या रसाविषयी नसून व्यक्तिच्या मानसिक स्थिती संबंधी समजावा)...... विषेशतः शांतरस किंवा करूणरस वगळून इतर सर्व रस, प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी शिव्यांची किती जबरदस्त मदत होते की नाही? शिव्यांशिवाय भांडण म्हणजे वाजंत्र्यांशिवाय वरात. मजा येईल तरी कशी ?
समाजाने खरंतर शिवीगाळ या कलेला (किंवा कौशल्याला) सन्मान द्यायला हवा होता. परंतु दुर्दैवाने साक्षात मात्र शिव्यांचा आणि शिवीगाळ करणाऱ्यांचा तिरस्कारच केलेला पहायला मिळतो.
योग्य वेळी, योग्य प्रसंगी, आपल्या सभोवतीच्या परिस्थितीवर नीट लक्ष ठेवून, योग्य ती शिवी निवडून, योग्य टायमिंग साधून, आपल्या आवाजावर एखाद्या नाटकातील नटश्रेष्ठासारखं नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीवर अपेक्षित परिणाम होईलच अशा प्रकारे एखादी इरसाल शिवी घालता येणं (किंवा 'हासडता' येणं) हे येरा गबाळ्याचे काम नाही. 'कलाकौशल्य'च म्हणायला हवं ते ! पटत नसेल तर प्रयत्न करून पहा...जमलं नाही तर हसं होईल.
बरं. शिवीगाळ हा तसा सर्व जगभरात आढळणारा आणि प्रत्येक संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे ती काही कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही (किंवा फक्त आपल्याच संस्कृतीचा दोषही नाही). पण असं असून सुद्धा शिवीगाळ या विषयावर फार मोठ्या प्रमाणावर 'वाचनीय' साहित्य उपलब्ध नाही. (असं मला वाटतं).
हे साहित्यिक जवळपास प्रत्येक साहित्य संमेलनाआधी संमेलनाचं स्थळ, त्याच्या व्यासपीठाला कोणाचं नाव द्यायचं, मग अध्यक्ष कोण, त्याची निवडणूक, प्रमुख पाहुणे कोण इथपासून ते संमेलनात जेवण कसलं हवं (सारांश मराठीतील साहित्य सोडून इतर सर्व) मुद्द्यांवर भांडतात. सुरुवातीची त्यांची नाराजी आणि आक्षेप हळूहळू निषेधात परिवर्तीत होते आणि शेवट एकमेकांविरुद्ध लाथाळ्या, कुचाळक्या, अपशब्द वापरून होतो. मग कुठे ते संमेलन थाटात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडतं. (माझी आजी आमच्या लहानपणी अशा प्रसंगाला 'गर्दभप्रेम' शब्द वापरायची. गाढव आणि गाढविण आपले प्रेमसंबंध प्रथम एकमेकांना लाथा घालूनच व्यक्त करतात आणि मग त्यांचं मिलन होतं म्हणे. तसं). हे सगळं रितीरिवाजानुसार चालू आहे. पण म्हणूून संमेलनात कविसंमेलना बरोबर एखादं शिवी-संमेलन ठेवतील तर शपथ. संमेलनात एक दोन तासाचा 'अभ्यास वर्ग', "शिव्या-काल, आज आणि उद्या" असा ठेवतील तर पुढच्या पिढीत हे सारस्वताचं भांडार नीट जपलं जाईल ना ? पण हे सांगणार कोण ? असो.
तर चला. या लेख मालिकेत आपण आपल्या लाडक्या मराठमोळ्या शिवीगाळ संस्कृतीबद्दलची काही रंजक वैशिष्ट्ये पाहू.
डॉक्टर करंबेळकर राजेंद्र पु.
निगडी, पुणे.
(क्रमशः)
Well written
LikeLiked by 1 person
प्रस्तावना वाचल्यावरच उत्सुकता ताणली गेली आहे. आगळ्या वेगळ्या विषयावर आपल्या डॉ.मंडळींपैकी गाळीव अर्कच लिहू शकतात. राजेंद्र तुझ्या लेखनाची वाट पाहत आहे.निवडक शिव्यांसह अनेक शुभेच्छा.
LikeLiked by 1 person
पु.ल. देशपांड्यांची आठवण करुन देणारा लेख.
कल्पनेच्या विश्वातून शब्दांची सर्कस मनात उतरवणारा लेख
चांगल साहित्य वाचल्याचा आनंद मिळाला
आपला फोन नं मिळाला तर बरे वाटेल
डॅाक्टर वाळके
९३७१०८४२००
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
LikeLiked by 1 person