Use of abusive language in Marathi and the reasons behind it, beautifully penned by pediatrician Dr Karambelkar… Part 3
शिवीगाळ एक चिंतन (भाग तीन)
शिवीगाळ: बिगरी ते डिग्री
माझं बालपण कोकणात गेलं. इथे जवळ पास सगळेच पालक आपल्या लाडक्या अपत्याला सकाळी सकाळी …” रे…मेल्या ऊठ. न्हिजतंय काय? ” किंवा ” रे माय×× उठ. दोंपार व्होउक इली मरे” असं म्हणूनच झोपेतून जागे करतात. मग त्यात पाल्याचा अपमान किंवा त्याला त्याच्याच आईवरून शिवी घातली यात आपणच आपल्या बायकोला पण शिवी घातली याचं भान नसतं तर एक आपुलकी असते.
कोकणात अनेकजण कोणत्याही वाक्याची सुरुवात शिवीनेच करतात. काहीवेळा तर “मी माय××× त्याका ऐकतंय ? तो माय××× माझा काय वाकडा करतलो?” …अशा प्रकारच्या वाक्यांमधे स्वतःला सुद्धा शिवी घालणारे महाभाग पण आढळतात! बर्याच वेळेस तर संभाषणातला शिवी-सद्रृष शब्द खरी शिवी आहे का ‘उगाचच’ वापरलाय हे समजणं सुद्धा अवघड व्हायचं लहानपणी.
(दुर्दैवाने) आमचं कुटुंब पडलं (अती) शिकलेल्यांचं. त्यात परत गावात माझ्या वडलांना खूप मोठा मान होता आणि त्यामुळे आम्ही कधीच कुणाला अपशब्द वापरायचा नाही असं आमच्यावर अलिखित बंधन होतं. म्हणजे एक मोठं दडपण होतं (खरं तर संकटच) म्हणा ना.
त्यामुळे लहानपणी मला कुणाही बरोबर भांडताना पंचाईत व्हायची. अपशब्द वापरायचाच झाला तर फार फार तर गाढव, माकड, बैल, बोकड, रेडा (समोर मुलगी असेल तर म्हैस) इत्यादींवरच भागवायला लागायचं. बरं त्यातही कोणाला ‘कुत्रा’ म्हणणं मात्र थोडं धोकादायक वाटायचं…कारण त्याचा परिणाम थोडा गंभीर व्हायची भिती वाटायची.
शहरातील सुसंस्कृत कुटुंबात सुद्धा काही पालक आपल्या मुलांसाठी कौतुकाने डँबिस (हा शब्द इंग्रजीतून damn beast वरून आला असावा) किंवा लब्बाड, चावट इ. शब्द वापरत असतात. निरागस अपशब्दांची सुरुवात खरं तर तिथेच होते. काहीवेळा हे कौतुक गमतीदार असतं.एका आजोबांनी माझ्यासमोर आपल्या अतिशय चपळ नातवाचं “लय हरामी बघा…एका जागी म्हणून बसत नाय” असं कौतुक केल्याचं मला आठवतंय. अर्थात सद्ध्या मराठी भाषेच्या वापरात खूपच बदल झालाय. एखाद्या खूप सुंदर चित्रालासुद्धा लोकं ‘भयानक’ सुंदर असं सहजच म्हणतात (आता सुंदर गोष्टीतून यांना भय कशाचं वाटतं देव जाणे) किंवा कुठची तरी मिसळ त्यांना ‘भयंकर टेस्टी’ लागत असते. त्याच न्यायाने नातू लय हरामी म्हणजे अतिशय चांगला !
बहुतांश कुटुंबामधे आजही लहान मुलांचं शिवीगाळ या क्षेत्रातील ‘प्रारंभिक शिवीगाळ प्रशिक्षण’ पशूवाचक अपशब्दांचा वापर करूनच होतं. विषेशतः भावंडांमधल्या भांडणात हे प्राणी खूप कामाला येतात. एखाद्या प्राण्याची ‘उपमा’ भावंडाला देताना त्यात त्या प्राण्याच्या विषेश गुणांचा संबंध असायलाच हवा असं बंधन नसतं. प्राण्यांमध्ये गाढव सगळ्यांचाच लाडका. अगदी मोठ्यांचाही. विषेशतः प्राथमिक शाळेत शिक्षक आणि घरी वडील या दोघांचा. डुक्कर आणि माकड हे पण तसे लोकप्रिय प्राणी आहेत. कुत्र्याची लेव्हल थोडी ‘वरची’.
मुलांना शाळेत सोडताना आणि परत आणताना, विषेतः ज्यांना त्यांचे पालक दुचाकीवरून सोडतात त्या मुलांच्या कानावर नकळतपणे शिव्या पडत जातात. जर मूल पुढे उभं असेल तर अगदी कानातच घुसतात. शिव्या घालणे/घालता येणे हा वाहन चालवता येण्याच्या कौशल्याचाच एक भाग असतो हे त्यांच्या मनावर लहानपणापासून अगदी व्यवस्थित ठसलं जातं.
एकंदरीतच लहानपणी हे शब्द वापरण्याचा हेतू एकच असायचा. समोरच्याची चिडचिड झाली आणि त्याची किंवा तिची रडारड झाली की आपलं काम झालं. बस्स! नंतर मात्र शिवीगाळ करण्याचे इतर वापर जमायला लागतात.
पशूवाचक शब्द संपदेवरुन आठवलं. मध्यंतरी एका उच्च न्यायालयाच्या आवारातील चिखलात (कोर्टरुमच्या बाहेरचा बरं का ) नेहमी लोळणारा एक डुक्कर अचानक दोन तीन दिवस न दिसल्यामुळे एक न्यायाधीश इतके कासावीस झाले असं म्हणतात की न्यायाधीश महाराजांनी (एखाद्याला भांडणात “तू काय स्वतःला महाराज समजतो का काय ?” असं म्हणून तर दाखवा…असो) त्वरित शहराच्या पोलीस निरीक्षकाला त्या डुकराचा शोध लावून 24 तासात आपला रिपोर्ट सादर करायचा आदेश दिला होता. मग काय ? शहरातलं संपूर्ण ‘खातं’ वराह-शोध मोहिमेत गुंतलं. पण लोक असं म्हणतात की त्यामुळे त्या दिवशी डुक्कर सापडेपर्यंत शहरातील लोकांचा दिवस मात्र सुव्यवस्थेत गेला म्हणे.
रिकामपणाचे धंदे फक्त आपल्याच सुचतात असं नाही. जणू अशा माणसांची संख्या कमी आहे म्हणून की काय अशा प्रकारात भरीत भर म्हणून प्राण्यांच्या ‘मानवाधिकार (?) आणि ‘मुलभूत हक्कांसाठी’ लढणाऱ्या महानुभावांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहिल्यावर वाटतं की तो दिवस दूर नाही जेव्हा पशूवाचक शिवीगाळ करण्याला नक्कीच कायदेशीर बंदी घालण्यात येईल. ( आता तुम्ही माणसाला गाढव म्हणणार असाल तर गाढवाला मानवाधिकार का नकोत ? या तर्कशुद्ध विचारांनी प्रेरित होऊन एखाद्याने जर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तर मला खात्री आहे की त्याचा सहानुभूतीपूर्वक आणि तात्काळ पाठपुरावा केला जाईल)
असो.अगदी लहानपणी हे गाढव-बैल ठीक होतं. पण कालांतराने पुण्यात आल्यावर मात्र माझी पंचाईत झाली. माणूस ‘रस्त्यावर आला’ की त्याची वागणूक बदललीच समजा असं दिसायला लागलं. रस्त्यावर आपल्या वाटेत आपल्या पायावर थुंंकीचा फवारा करणारे रंगकर्मी, चौकात आपल्या मागे कर्णकर्कश हॉर्न वाजवून आपल्याला काही ‘सेंटिमीटर’ पुढे जायचा आग्रह करणारे लोक, सिग्नल हिरवा झाल्यावर हाॅर्न वाजवणारे ‘डोळस’ लोक….एक ना अनेक वल्ली ज्यावेळी माझ्यावर आपली मेहेरनजर करायला लागले तेव्हा मात्र त्यांच्यावरचा राग व्यक्त करायला या शिव्या फारच अपुऱ्या आणि तुच्छ आहेत असं जाणवायला लागलं.
मग तेव्हापासून मी माझ्या शब्दसंग्रहात प्रयत्न पूर्वक भर घालत गेलो. कालांतराने खोटारडा, चोर, नालायक, लुच्चा, लफंगा, हरामखोर असे विविध आकर्षक अपशब्द गोळा करत करत हे शिक्षण शेवटी अर्वाच्य शिवीगाळ करता येईल या टप्प्यावर कधी पोचलं (बहुतेक सर्वांचा हाच अनुभव असणार) आणि पहाता पहाता बालवाडी पासून पदव्युत्तर डिग्री पर्यंत आपण कधी पोचलो ते कळलंच नाही. आता वेळ काळ पाहून मी मनापासून (आणि बहुतांश वेळा मनातल्यामनात!) सहजच शिवी हासडून आपल्या रागाला मोकळं करू शकतो. काय मस्त वाटतं सांगू.
डॉक्टर करंबेळकर राजेंद्र पु.
निगडी, पुणे.
(क्रमशः)