कालांतराने समाज व्यवस्थेत जेव्हा तो रहायला लागला असेल तेव्हा नक्कीच आपापसात वादावादीला (लफड्यांना) सुरुवात झाली असेल…आणि थोड्या थोड्या भाषेची पण सुरुवात झाली असेल. अशावेळी शिव्यांचा जन्म होणं ही काळाची गरज होती.
असं म्हणता येईल की शिव्यांचा जन्म भाषेच्या अगदी सुरुवातीचा आणि बाकी भाषेचा सर्वांगीण विकास थोडा उशिरानेच झाला असावा. त्यामुळे ढोबळ मानाने शिव्यांचे वर्गीकरण प्राच्य आणि अर्वाच्य (!!!) असं करता येईल. पण आजकाल सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर जशा चित्र-लिपीत लिहिलेल्या शिव्या सर्रास दिसतात तसं काही आदिमानव रहायचा त्या गुहांमधल्या चित्रांमधे आढळत नाही.
आपल्या पौराणिक कथांंमधे आपले ऋषिमुनी आणि देव यांना राग आला (त्या काळात रागाला क्रोध किंवा कोप असंच म्हणायची फॅशन होती. असो. ) की दुसर्याला ते अपशब्दांबरोबर एखादा शाप पण द्यायचे.म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर त्या काळात ‘शाप’ हे शिव्यांबरोबर कॉंप्लिमेंटरी असायचे. एकावर एक फ्री ! ” तू पुढच्या जन्मी श्वान होशील” वगैरे. त्यामुळे त्या काळात शिवीगाळ या शब्दाऐवजी ‘शिव्याशाप’ हा शब्द प्रचलित होता. (आमच्या लहानपणी गावात कुणी दाढीवाला फकीर दिसला की आम्ही घाबरून दूर पळून जायचो. काय सांगावं उगाच त्याला राग आला तर फुकट आपलं कुत्र्याचं पिल्लू करून टाकायचा). पण आजकाल आपले बहुतांश दाढीवाले अगदी रांग लावल्या सारखे तुरुंगात जाताना दिसतायत. शिवाय शापांची थोडीफार शिल्लक राहिलेली भिती अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांनी घालवली. त्यामुळे आता फक्त शिवीगाळ शिल्लक आहे शिव्याशाप नाही. नाही म्हणायला शाप हा शब्द जरूर ऐकायला मिळतो तो रास्त धान्य दुकानात, जिथे साखर नेहमीच ‘शाप’ संपलेली असते.
एखाद्याची निर्भत्सना करायला त्या काळात सुसंस्कृत अपशब्द (म्हणजे संस्कृत मधून आलेले म्हणून ! ) वापरले जात. त्या काळात वापरले जाणारे नराधम, क्रूर, अधर्म्या, लंपट, चांडाळ, निर्दयी, पाषाण हृदयी, अधमा, अमानवी असे अनेक शब्द आजकाल ऐकायला तर सोडाच वाचायला देखील मिळत नाहीत. नवीन पिढीतील मुलांना जिथे ‘कडेवर वळ’ म्हटलं तर तोंडाकडे पहात बसतात आणि ‘ एका साईडला टर्न हो’ म्हटलं तरच वळतात त्यांना हे शब्द अपशब्द आहेत हे सांगून देखील कळणार नाही…किंबहुना त्यांना ‘अपशब्द’ हाही शब्द कळणार नाही.
माझी आजी जबरदस्त धार्मिक होती. सतत पौराणिक कथा वाचायची आणि रेडिओ वरची कीर्तनं पण ऐकायची. त्यामुळे आजोळी गेलं की तिच्या तोंडी कधीतरी ‘शुंभ, षंढ, मूर्ख’ असे वेगळे शब्द ऐकायला मिळायचे. आजकाल तेही क्वचितच ऐकायला मिळतात. तशी ती कधीतरी ‘लंबकर्णा’ हा पण शब्द वापरायची. (गाढवाला राग येवू नये म्हणून).
संत वाङ्मयाचा विचार केला तर तिथे शिव्यांना अजिबात थारा नाहीये असं वाटतं. आपल्या वैयक्तिक जीवनात काहीवेळा दुसर्यांनी केलेली आपली निंदा मात्र आपल्या ‘सुधरण्यासाठी’ किती आवश्यक आहे हे सांगण्यासाठी जगद्गुरूंनी लिहून ठेवलंय की “निंदकाचे घर असावे शेजारी.”
म्हणजे शेजाऱ्याने केलेली निंदानालस्ती आपण किती हसत खेळत स्वीकारायला हवी ही त्यांनी दिलेली शिकवण (महत्त्वाची) आहे. त्यामुळे आपला शेजारी आपला निंदक असणे अतिशय आवश्यक आहे. आपले संबंध आपल्या शेजाऱ्या बरोबर (किंवा विषेशतः शेजारणी बरोबर) जर प्रेमाचे असतील तर तुम्ही नक्की प्रॉब्लेम मधे आहात असं गृहीत धरायला काहीच हरकत नाही !
बरेचसे अपशब्द आजकाल क्वचितच ऐकायला मिळतात. (मी सदासर्वकाळ शिव्या घालतो किंवा शिव्या घालणाऱ्यांच्या संगतीत रहातो असा गैरसमज कृपया वाचकांनी करून घेऊ नये).
उदा. ‘अक्करमाशी’ ही शिवी ऐकल्याला खरंच जमाना झाला. त्याचा खरा अर्थ आजही माहीत नाही मला पण माझ्या बाबांचा तो आवडता शब्द होता. या शब्दाच्या आठवणी वरून मला आणखी एक शोध लागला तो म्हणजे प्रत्येकाची अशी एखादी शिवी ‘आवडती शिवी’ असते की जिचा वापर ती व्यक्ती सर्रास करत असते आणि काही शिव्या त्याच्या ठेवणीतल्या शिव्या असतात…विषेश प्रसंगी वापरायच्या. ठेवणीतल्या साडी सारख्या.
शिवीगाळ म्हटलं कि नात्यांवर आधारित शिव्या आणि शारीरिक अवयवांवर आधारित शिव्या ह्या प्रथम दर्जाच्या शिव्या…. इरसाल आणि अर्वाच्य. (त्या विषयावर पुढच्या लेखा मध्ये). पण अपशब्द म्हणून इतर अनेक गोष्टींचा सुयोग्य वापर वेळोवेळी केला जातो. अपशब्द म्हणून जशी प्राण्यांची मदत घेतली जाते तशी इतर अनेक गोष्टींची मदत होते. ‘हलक्या फुलक्या’ चिडवण्यासाठी बटाटा, रताळं, दोडकं, भोपळा, कुजकट बेदाणा अशा अनेक खाद्यपदार्थांचा उपयोग होतो. पक्षांमध्ये पोपट, कावळा, कोंबडी तर भांड्यांच्या श्रेणीत चमचा, माठ आणि रांजण लाडके असल्याचं दिसतं.
भाषेत बदल घडत जातोय तसा प्रचलित शिव्याही बदलत चाललेल्या दिसतात. प्रत्येक पिढीतल्या प्राधान्याने वापरल्या गेलेल्या शिव्यांवरून आणि त्यात होणाऱ्या बदलांवरून मानववंशशास्त्रज्ञ बरेच निष्कर्ष काढतात असं माझ्या वाचनात आलं तेव्हापासून शिवीगाळ या प्रकाराबद्दल माझा आदर खूपच वाढलाय !
आजकाल इतर भाषांचा प्रभावही आपल्यावर वाढत चाललाय. शिव्याही त्याला अपवाद नाहीत. ‘साला’ ही शिवी हिंदीतून (सिनेमातून) आली आणि आपलीच होवून गेली. तसं आपल्या भाषेत आपला पाय सालीवर घसरतो….पण ती केळ्याची साल.
‘बा×टर्ड’ ही शिवी नव्या पिढीची लाडकी. विषेशतः इंग्रजीतून शिकणाऱ्या मुलांची. पण जिथे तिथे तिच ती शिवी वापरताना त्यांना ऐकल्यावर मात्र आपली समृद्ध शिवी-विविधता आता कमी होत जाईल का काय अशी शंका उगाच मनात येते.
असो. काळाच्या ओघात जिथे मदरटंगच साईडला पडायला लागलीय तिथे शिव्या तरी काय टिकणार म्हणा ? आई-माई वरच्या शिव्या टिकल्या तरी खूप झालं.
डॉक्टर करंबेळकर राजेंद्र पु.
निगडी, पुणे.
(क्रमशः)
🙃🙃😁😁
LikeLiked by 1 person