पुढे लिहिलेल्या घटनांमधे समान गोष्ट कोणती ?
एक: चौकात ट्रॅफिक सिग्नल लाल आहे. तुम्ही इमानदारीत तुमची गाडी बंद करून थांबलाय आणि शेजारून एक दुचाकीवाला हळूच तुमच्या गाडीच्या साईड मिररचा मुका घेऊन पुढे जातो.
दोन: कुठल्या तरी तिकीट काढायच्या रांगेत तुम्ही बराच वेळ ताटकळत उभे आहात आणि खिडकी उघडताच रांगेत उभा नसलेला कुणीतरी सोम्यागोम्या डायरेक्ट खिडकीला भिडतो आणि तिकीट काढायचा प्रयत्न करतो.
तीन: सकाळी सकाळीच तुमच्या घरच्या गेट समोर प्रभातफेरीला आलेला कुत्रा शी करतोय आणि आपल्या कुत्र्याला घेऊन आलेला मालक त्याचा पट्टा पकडुन मोठ्या सबुरीने त्याच्या शीचा कार्यक्रम पूर्ण व्हायची वाट बघतोय.
तुम्ही नक्कीच गोंधळला असाल की या तीनही घटनांमधे कोणती समानता आहे ?
उत्तर आहे…दुचाकीस्वार, सोम्यागोम्या आणि कुत्र्याच्या मालक या तिघांच्याही आईची चूक. अजून नाही समजलं ?
वरची तीन उदाहरणंच नाहीत तर वादाच्या जवळपास सर्व गोष्टींमधे/घटनांमधे दुसर्याच्या आईला भांडणात खेचलं जातंच. का ? अशा नमुन्यांना तिने जन्म दिला म्हणून ? बिच्चारी आई.
मला वाटतं बहुतांश भांडणांमधे “तुझ्यायला तुझ्या” हीच नांदी असते आणि नाटकातले पुढचे संवाद हे पूर्णपणे spontaneous असतात. हे असं का ? याचा फार गांभीर्यपूर्वक (?) विचार केल्यावर मला एक महत्वपूर्ण शोध लागला तो असा की एखाद्याच्या प्रिय व्यक्तीचा त्याच्यासमोर अपमान केला तर त्याचा परिणाम हा त्या व्यक्तीच्या अपमानापेक्षा जास्त होतो (हा नियम लवकरच मी मानस शास्त्रात माझ्या नावावर खपवणार आहे). शिव्या आणि आई किंवा आपली इतर नाती यांचं त्यामुळेच विषेश नातं आहे.
बर्याचशा प्रचलित आणि लोकप्रिय (?) शिव्या या आई या दैवतावर आधारित आहेत. अर्थात त्या शिव्यांचा इथे जाहीर पणे उल्लेख करणे अनुचित तर आहेच पण त्या शिव्यांचा सार्वजनिक वापरसुद्धा निंदनीय किंवा अंगावर शिसारी आणणारा एक किळसवाणा प्रकार वाटतो. पण चिंतनाचा एक भाग म्हणून असं वाटतं की आईवरून घातलेल्या अशा घ्रृणास्पद शिव्या ऐकून कोणाच्याही अंगाचा तिळपापड होईल आणि म्हणूनच की काय, प्रतिस्पर्ध्याचे रक्त सहजच उकळून काढण्यासाठी हा एक अतिशय सोपा उपाय आहे. जर उद्या कोणी शिव्यांचा प्रभावीपणा मोजण्यासाठी एखादी पद्धती (scale) शोधली (असा महाभाग नक्की पैदा होणार) तर या आईवरून घातलेल्या शिव्यांचा प्रभाव (impact factor) इतर शिव्यांपेक्षा खूपच जास्त सापडेल.
लहानपणी मला जे आई वर आधारित शब्द अपशब्द वाटायचे (आणि घरी त्यांच्या उल्लेखावर पूर्ण बंदी होती) ते सारे (त्या वेळचे अप-) शब्द आता मात्र बर्यापैकी ‘नॉर्मल’ समजले जातात. त्यात काही काही शब्द वेगवेगळ्या भागात प्रकर्षाने बोलले जातात असही वाटतं. उदा. ‘आवशीक खाओ कोलो’ / आवशीचो घो (कोकण), मायला (पश्चिम महाराष्ट्रात), च्यायला (पुणे), आयला (मुंबई). नवीन पिढीत ‘आईच्ची जय’, ‘आईच्च्या गावाला’ (आईग्ग…खूप जुना) किंवा फक्त ‘आईच्ची’ हेही वापरलेले दिसतात.
‘तुझ्यायला’ हा मैत्री दर्शक असला तरी ‘तुझ्यायला तुझ्या’ हा मात्र बहुतेक वेळेस ज्वलनशील असतो.
‘आयला’ ह्या शब्दाचं आणखीन एक कौतुक आहे. हा शब्द वेगवेगळी रसोत्पत्ती सहजच निर्माण करतो पण त्याच बरोबर मराठीतून हिंदीत गेलेल्या काही शब्दांमधे हा शब्द आजकाल स्वच्छपणे ‘नॉर्मल टपोरी’ शब्द म्हणूनही वापरला जातो.
“आयला रे लडकी मस्त मस्त तू आयला रे….
फिर से बोल जरा तू जो बोला रे…” हे गाणं त्याचंच उदाहरण आहे.
आईच्या नंतरचं प्रेमळ नातं म्हणजे बहिणीचं नातं. बहिण-वाचक शिव्यांच्या एकंदरीत (जास्त) वापरावरून असं दिसतं की बहिणीवरच्या प्रेमाच्या बाबतीत पंजाबी लोक आपल्या खूप पुढे आहेत.
पण आई-बहिणी वरच्या शिव्यांची लोकप्रियता पाहून हे ही सिद्ध होतं की आपण फारा-पूर्वीपासून आपल्या माता भगिनींचा किती आदर करत आलो आहोत आणि ही नाती आपल्या हृदयाच्या किती जवळची आहेत. विषय मराठी भाषेचा आहे, पण मला माहीत असलेल्या इतर भाषांचा जर मी विचार केला तर एक गंमत सगळ्याच भाषांमधे समानतेने मला आढळली आणि ती म्हणजे आई-माई वर आधारित शिव्या सर्व भाषांमधे आहेत !
इतर नात्यांवरचं आपलं प्रेम किती आहे हे त्या त्या नात्यांवर आधारित शिव्या किती आहेत यावरून स्पष्ट होतं. “The number of Abusive words present in the language are directly proportional to the intensity of love with that relationship in the culture using that language” असाही एक सिद्धांत (?) माझ्या नावावर प्रकाशित होणार आहे. (हे मुद्दाम इंग्रजीत लिहिलंय. कारण एखादी अत्यंत फालतू गोष्ट सुद्धा इंग्रजीत लिहिली की तिचं ‘वजन’ वाढतं आणि लोकांना ती पटवायला सोपं जातं. असो.)
बाप, आजा (आजोबा), आजी यांचा उद्धार त्यामानाने कमी वेळा ऐकायला मिळतो. चुकून कधीतरीच काकाचा (काकोबा) उद्धार होतो. काकू, मामा ही नाती/शब्द तर काहीवेळा अपशब्द म्हणूनसुद्धा वापरले जातात. आत्या, मामीचा वापर क्वचितच.
अगदी खानदानाच्या 56 पिढ्या सुद्धा निघतात पण भावावरून शिवी कुणी ऐकलीय? मी तरी आज तागायत ऐकल्याचं आठवत नाही. पण यावरून भाऊ या नात्यात अजिबात दम नाही हे स्पष्ट होतं असंच मला वाटतं.
या सर्व नात्यांवरील शिव्यांचा विस्तृत उल्लेख (जंत्री सारखा) करायचं म्हटलं तर एक छोटा शब्दकोश नक्कीच तयार होईल. पण या शिव्यांची जंत्री लिहिणे हा या चिंतनाचा भाग नसल्यामुळे ज्या ज्या इच्छुकांना या शिव्यांची प्रतिक्षा होती त्यांनी कृपया आपली उजळणी आपल्या आपणच करावी.
* नाती-गोती हा शब्द लिहिताना उगाचच असं वाटलं कि जी नाती आपल्याला गोत्यात आणतात त्या नात्यांना ‘गोती’ म्हणायचं असतं का ?
डॉक्टर करंबेळकर राजेंद्र पु.
निगडी, पुणे.
(क्रमशः)