एखाद्या वादात खरी बाजू कोणाचीही असो. कुणीतरी शिवी घालण्याचं निमि त्त….संपूर्ण भांडणालाच एक नाट्यमय कलाटणी मिळते. मुला-मुलांमधे कोणाचा कोणाला धक्का लागून (मग तो मुद्दाम असेल किंवा चुकून) पडल्याच्या भांडणाचा शेवट मात्र कोण कुणाला गाढव का म्हणाला? (किंवा….मी म्हटलंच नाही !) यातच होतो.
(नवरा बायकोच्या भांडणात बहुतेक वेळा विषयाला कलाटणी, कुणीतरी माघार घेईपर्यंत सहजच शिवीगाळ न करताही मिळत जाते त्यामुळे शिव्यांची फारशी गरज नसते. किंबहुना काहीवेळा तर कुणाचा तरी अबोला सुद्धा शिवी घालण्यापेक्षा जास्त अपमानास्पद वाटतो….)
भांडण आणि शिवीगाळ यांचं नातं जणू जिवा-शिवाचं (? जिवा-शिव्यांचं) नातं. खरंतर दोन्हीही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. शिव्यांचा वापर मूलतः आपला राग व्यक्त करण्यासाठी केला जातो हे सर्वज्ञात आहे. पण म्हणून चवताळून शिव्या घालणाऱ्याचीच बाजू खरी असेल असं मात्र गृहीत धरता येत नाही.
हे खरं आहे की शिव्यांचा वापर मुख्यतः भांडणाचा ‘दर्जा’ वाढविण्यासाठी होतो आणि होत राहील. पण “आयला” किंवा “आयला रे” हा शब्द आनंद-हर्ष, राग, आश्चर्य, दुःख, करुणा अशा अनेक भावना व्यक्त करण्यासाठी खूप मदत करतो. वेळ मिळेल तेव्हा एकदा नाटकाच्या तालीम करतो आहोत असं समजून आयला हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे उच्चारून बघा. मजा येईल.
भांडणातला शिव्यांचा रोल सोडून द्या. खरी गंमत ही आहे की शिव्या मनोरंजनाचं काम पण समर्थपणे करू शकतात. मध्यंतरी ‘हरामखोर’ या अपशब्दाच्या वापरावरून महाराष्ट्रातील जनतेचं काही दिवस खूप छान मनोरंजन झाल्याचं तुम्हा सर्वांना आठवतच असेल.
कोकणात होळीच्या आसपास रोंबट केलं जातं. त्यात ढोल ताशाच्या बरोबर प्रौढ (शक्यतो दारू पिऊन) आणि मुलं (प्यायचा चान्स मिळतोय का याचा विचार करत) बेधुंद नाचत असतात. ते करताना शिव्या घालत घालत नाचणे हा त्याचा आवश्यक भाग असतोच पण ढोलाच्या तालात जी गाणी म्हटली जातात त्यातही बरेच अपशब्द असतात. त्यातलंच एक थोडंसं सोज्वळ गाणं आठवतंय…
होळी रे होळी
पुरणाची पोळी
सायबाच्या ××त
बंदुकीचा गोळी…
कदाचित असेच काही सांस्कृतिक कार्यक्रम इतरही भागात होत असतील. पण कोकणात जिथे लोक उठता बसता शिव्या तिन्हीत्रिकाळ घालत असतात तिथे होळीनिमित्त शिव्या घालण्यात फारसं अप्रूप नाहीये.
शिव्यांचा/अपशब्दांचा वापर अतिशय कलात्मकपणे लोककला आणि नाटक- सिनेमात सुद्धा केलेला आपण सर्वांनीच पाहिला असेल. विशेषतः दादांचे सिनेमातले काही (द्व्यर्थी) संवाद तर आजही लोकप्रिय आहेत. त्यांची ‘मायला’ म्हणण्याची स्टाईल (मराठीत त्याला लकब म्हणतात) तर आजही लोकप्रिय आहे.
लोककलेवरून लहानपणी ऐकलेली एक गमतीदार गोष्ट आठवली. एका गावात तालुक्याचे मामलेदार (जे फारसे लोकप्रिय नसावे ) भेट द्यायला आले होते. त्यांच्या स्वागत समारंभात गावातला एक इरसाल नमुना उभा राहिला आणि त्याने शाहिराच्या आवेशात गायला सुरुवात केली…
अहो…मामलेदार साहेब…
अहो…मामलेदार साहेब…
तुमच्या मायची..मी…
तुमच्या मायची.. मी…
तुणतुणं वाल्याने मस्त ठेका धरला होता आणि बराच वेळ हा पठ्ठ्या फक्त “तुमच्या मायची मी…” एवढंच आळवत बसला. त्याच्या ‘मायची मी’ म्हणण्याच्या शैलीवरून प्रेक्षक हळूहळू खुदूखुदू हसायला लागले. इकडे मामलेदार साहेबांंचा पारा हळूहळू वर चढायला लागला. शेवटी ज्यावेळी त्याने आपली गाडी कुठे …तुमच्या मायची मी वरून –
करीन…चाकरी…खाईन… भाकरी…
करीन…चाकरी…खाईन… भाकरी…
वर वळवली तेव्हा कुठे मामलेदार जाग्यावर आले !
आपण सर्वांनीच पाहिलं असेल की जवळपास प्रत्येक वेळेस भर रस्त्यावर जेव्हा भांडण चालू होतं तेव्हा एक एक करून बघ्याची संख्या वाढत जातेच. जमावातील मध्यवर्ती प्रेक्षक भांडणाचं कारण समजून घेऊन त्यावर न्यायाधीशाची भूमिका सांभाळत असतात. तर काहीजण ‘हात साफ करायचा चान्स मिळाला तर करून घेता येईल’ म्हणून वाट पहात असतात. थोडे बाह्यांगाने उभे, अतिशय आत्मियतेने भांडणाचा रसास्वाद घेत असतात तर नवीन दाखल होणारे आपण काहीतरी अतिशय सुुरस आणि रंजक घटना पहाण्या पासून वंचित तर नाही ना झालो या आशंकेने..”काय झालं ? काय झालं ?” अशी विचारणा करत घोळक्यात सामील होत असतात. बघ्यांचा उत्साह जणू एखाद्या क्रिकेटच्या लाईव्ह मॅचच्या शेवटच्या ओव्हर सारखा…एकदा का हाणामारीला सुरुवात झाली की मग मात्र मॅच संपल्यावर पांगापांग होते तशी. हो, नाहीतर उगाचच एखाद्याचा गुद्दा आपल्यावर शेकायचा.
एकंदरीतच अशा भांडणांना जे सार्वजनिक मनोरंजनाचं स्वरूप प्राप्त होतं त्यावरून भांडणांनाही एक लोककला म्हणून मान्यता मिळायला हरकत नाही. त्याचबरोबर शिव्यांना एक लोकप्रिय साहित्यप्रकार म्हणून शासनाने मान्यता दिली तर या कलेचा (आणि पर्यायाने) भाषेचापण अजून विकास होईल. विषेश करुन नवीन पिढीतील मुलांच्या मातृभाषेचा विकास होऊन त्यांचा दैनंदिन जीवनात मातृभाषेचा वापर पण खचितच वाढेल.
गल्ली पासून दिल्ली पर्यंत ही भांडण-संस्कृती फार हिरिरीने टिकवण्यात तमाम जनता उत्साहाने सहभागी झालेली पहायला मिळते. टीव्हीवरच्या रोजच्या वादविवादांचंच पहा ना ? सगळे तज्ञ मुद्द्यावरून गुद्द्यावर यायला बसल्यासारखेच बोलत असतात आणि जनता डोळे फाडून फाडून (आणि कान फुटेपर्यंत आवाजात) त्यात तल्लीन झालेले असतात. आणि याला ‘प्राईम टाईम’ मनोरंजन म्हटलं जातं हे विशेष. एकंदरीतच गल्ली पासून दिल्ली पर्यंत कोणत्याही घटनेवर/घडामोडींवर वाद हा व्हायलाच हवा ही भावना तीव्र पणे दिसून येते. काही काही वेळा तर असं वाटतं की भांडणाच्या विविध स्तरांवर स्पर्धा जर सरकारने आयोजित केल्या तर क्रिडास्पर्धांपेक्षा त्यामधून जास्त उत्पन्न मिळेल. शिवाय भांडणं रंजक करण्यासाठी नवनवीन शिव्यांची निर्मिती होईल.
डॉक्टर करंबेळकर राजेंद्र पु.
निगडी, पुणे.
(क्रमशः)
Good writing, enjoyed while reading,
LikeLiked by 2 people
My classmate Dr Rajendra Karambelkar.
LikeLike