शिवीगाळ एक चिंतन (भाग आठ)
शिवीगाळ: भविष्यातील अस्तित्व
भविष्यात शिव्यांचं वर्गीकरण कायदेशीर शिव्या आणि बेकायदेशीर शिव्या असं होईल असा माझा अंदाज आहे. विश्वास बसत नसेल तर आपल्या संसदेतील वादविवादच पहा. संसदेत वादविवाद घालताना वक्त्याला कोणते शब्द वापरायची परवानगी आहे आणि कोणते शब्द ‘अ-सांसदीय’ आहेत (अपशब्दांचं/शिव्यांचं हे गोंडस नाव) हे नियम आहेत. आणि कालबद्ध पद्धतीने वेगवगळे अपशब्द तिथे नॉर्मल म्हणून सर्व संमतीने स्वीकारले जातात. तिथेही रस्त्यावरच्या भांडणांसारखी भांडणं होत असतात. कायदे बनवणारे आपले प्रतिनिधि आरडाओरड तर करतातच पण एकमेकांवर कागदाचे बोळे, पुस्तकं, सहजगत्या उचकटता आले तर माईक किंवा खुर्च्यासुद्धा ऐकमेकांना फेकून मारतात. आपापसातले मतभेद कसे सोडवायचे असतात ह्याचं जणू एक आदर्श उदाहरण सर्व जनतेला कोणतीही लाज न बाळगता (तिथे ‘निर्लज्ज’ हा शब्द वापरलेला चालत नाही) आपले सांसद दाखवत असतात. अर्थात तिथली एक गंमत रस्त्यावर मात्र वापरता येत नाही. पीठासीन अध्यक्षाला न आवडलेले अपशब्द संसदेच्या ‘काम’काजाच्या (तिथे भांडणं जास्त आणि काम कमी ..त्यामुळे नक्की काय काम केलं किंवा काम झालं यापेक्षा वादविवाद झाला यातच त्यांना रस असतो) रेकॉर्ड मधून ‘काढून टाकले’ की भांडण मिटतं…रस्त्यावर मात्र दोन चार दात काढले तरीसुद्धा विषय संपेल याची खात्री नसते.
आजकाल न्यायव्यवस्था सुध्दा या विषयावर सतत नजर ठेवून आहे. दुकानात वेगवेगळे आयटेम खरेदी करता येतात, सिनेमातल्या लोकप्रिय गाण्याला आयटेम साँग म्हटलेलं चालतं पण एखाद्या आयटेम साँग करणार्या/किंवा तसं दिसणार्या तरुणीला ‘आयटेम’ म्हणता येत नाही. असं म्हटल्या बद्दल एका महाभागाला चक्क दीड वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली गेल्या आठवडय़ात! तेव्हा सर्वांनीच थोडं सावध रहायला पाहिजे आता.
काड्या करणे आणि काड्या लावणे याची महान परंपरा आपल्याला लाभली आहे. काही लोकांना शांतता अजिबात सहनच होत नाही. आता हेच पहा… भगवान महादेव कैलास पर्वतावर शांतपणे समाधी लावून बसलेत. तिकडे पार्वती हा भोलेबाबा कधी एकदा डोळे उघडणार म्हणून वाट बघत बसलीय. तेवढ्यात मदनाला कोणीतरी चुगली करायला सांगतं आणि तो बिनधास्त डायरेक्ट महादेवावर बाण मारून मोकळा पण होतो….पुढे जो काही जाळ महादेवाने काढला त्यात मदनच गायब ! काड्या करणं ही तिथपासूनची पारंपरिक आहे.
पण आजकालचे काड्या लावणारे लोक मात्र फारच हुशार झालेत. ते स्वतः पेटत नाहीत. फक्त पेटवत रहातात आणि दुरून मजा पाहत बसतात. उदा. बातम्यांच्या बहुतांश टिव्ही चॅनेल वर त्यांचे वार्ताहर, वृत्त संपादक आणि अँकर दिवस रात्र ‘ब्रेकींग न्यूज’ पेक्षा ‘ब्रेकींग पीस’चंच काम जास्त प्रमाणात करतात. आणि गंमत म्हणजे प्रत्येक घटनेला कुणितरी व्यक्ती जबाबदार असायलाच हवं (त्यात ती राजकारणी व्यक्ती असेल तर अहो भाग्य) हा त्यांचा हेका मती गुंग करणारा असतो…. अगदी आकाशातून कोसळलेल्या विजेमुळे झालेला अपघात का असेना मग ? यांचा प्रश्न असतो की सरकारने विजा कोसळू नयेत यासाठी काय पावलं उचलली? वीज विदर्भातच का कोसळली पश्चिम महाराष्ट्रात का नाही ? वीज कोसळण्यापूर्वी तिथे कोणते राजकीय नेते गेले होते आणि त्यांनी तिथे नक्की काय केलं? ते तिथून वीज कोसळण्यापूर्वी कसे वेळेत निघून गेले ? इ. इ. आणखी गंमत म्हणजे त्या प्रश्नावर सरकारचा प्रतिप्रश्न असतो की आधीच्या सरकारने तरी त्यासाठी काय केलं ? आणि हे एवढं सगळं मनोरंजन कमी की काय म्हणून न्यायव्यवस्था suo motu action घेऊन सरकारला नोटीस बजावते की अशा दुर्घटना (आकाशातून वीज कोसळणे) परत घडू नयेत यासाठी सरकार कोणती पावले उचलणार आहे ?….हे आहे आपलं प्राईम टाईम मनोरंजन!
ही सर्व माणसं ‘भांडण संस्कृतीचं’ संवर्धन जरूर करतात पण टीव्हीवर शिवीगाळ करायला बंधन असल्यामुळे ‘शिवीगाळ शब्दसंग्रहात’ मात्र त्याने फारशी भर पडत नाही असं म्हणावं लागेल. पण शेवट भांडणं टिकली तरच शिव्या टिकतील ना…
अंगणात दोन कोंबडे शांतपणे किडे-मकोडे टिपत असतील तर दोघांच्या मधे तांदळाच्या कण्या टाकायच्या आणि आपण निवांत पणे त्या दोघांमधलं कण्यांसाठीचं भांडण पहात रहायचं हे दृष्य कोकणात (आणि इतर अनेक भागात) कॉमन आहे. कोकणाचा संदर्भ देण्याचं कारण एवढंच की तिथे एकमेकांचं भांडण लावून देणे या क्रियेला ‘कण्या घालणं’ असंच म्हणतात.
कोंबडे, बकरे, बैल अशा अनेक प्राण्यांमधे झुंजी लावायच्या आणि त्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा ही आपली (मानवजातीची) परंपरा आहे. परंपरा म्हटल्यावर आठवलं…जळ्ळीकट्टू या परंपरागत सणात आतापर्यंत किती बैल मेले असतील माहीत नाही पण त्यावर कोर्टाने बंदी घातल्याच्या निषेधार्थ झालेल्या निदर्शनांमधे मात्र काही माणसं नक्कीच मेली…. बैलांची झुंज लावणं हा आपला मूलभूत हक्क आहे हे दाखवणं ही खरी जिद्द! असो.
जोपर्यंत राजकारण चालणार आहे तोपर्यंत मतभेद पण चालणार/वाढणार आहेत. माणसांना माणसांविरुद्ध झुंजवलं जाणार आहे आणि जोपर्यंत आपण त्यांची ही नौटंकी देहभान हरपून पहाणार आहोत (सहन करणार) तोपर्यंत त्यांची चलती रहाणारच आहे.
ही अस्तित्वाची लढाई आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी मग भांडणं आलीच. आणि शिवीगाळ केल्याशिवाय भांडणात मजा ती कसली ???
डॉक्टर करंबेळकर राजेंद्र पु.
निगडी, पुणे.
(समाप्त)