बुलबुल ची रोजनिशी ३
काय सांगू तुम्हाला, प्लॉट वरची पॅव्हेलियन ची सावली बघून बायको एकदम खूश !
मला म्हणाली काल तू जेवला नसशील या गडबडीत.आज तू आराम कर.
आणि मग पहाता पहाता तिने ‘मुहूर्तमेढ’ ठेवली. बाजुला छोट्या छोट्या काड्या ठेवल्या आणि मग कुठून तरी कापूस आणून जोतं नीट बांधलं.

लग्नापूर्वी हिला बघायला गेलो होतो तेव्हा बघण्याच्या कार्यक्रमात हिची आई मोठ्या कौतुकाने म्हणाली होती..”आमची बाळी की नई एका सुईवर पण विणकाम छान करते बरं का !”आज हिने आपल्या आईचे शब्द खरे करून दाखवले.
महत्वाचं म्हणजे आता घरासाठी जागा पसंत पडली का म्हणून विचारायची गरजच नाही.
मित्रांनो, आता पुढे काही दिवस आमचा पत्ता…
मुक्काम पोस्ट….ऑल स्पाइस !
चौथी फांदी, हवेत १२ फूट उंचीवर.
आपला
बुलबुल
दिनांक १ एप्रिल २०२२.