बुलबुल ची रोजनिशी ४
सुदैवाने घर बांधायला हवं असलेलं साहित्य इथे जवळच उपलब्ध आहे. शिवाय आम्हाला घर बांधायला कसलीही परवानगी लागत नाही. आर्किटेक्ट तर मुळीच नाही.
आम्ही पटपट घर बांधायला सुरुवात केली आणि गुडघाभर उंच बांधलं पण आणि मग एक गम्मत झाली.

आमची ही म्हणाली…” अहो आपलं घर तर पुढच्या दोन तीन दिवसात पूर्ण होईल….
मी: मग ?
ही: अहो मग पुढची तयारी करायला नको का वेळेतच ?
मी: म्हणजे ?
ही: अहो म्हणजे घर बांधून काय आपल्याला त्यात थोडंच रहायचं आहे !
मी: मग ?
ही: तुम्हाला ना….. काहिच कळत नाही !!!
ही एकदम लाजली आणि लाजेने चूर होऊन काही तरी बोलत भुर्रकन शेजारच्या आंब्याच्या झाडीत गायब झाली. मला त्या क्षणी काय झालं ते कळायच्या आत मी पण तिच्या मागोमाग गेलो.
……………………………..
तिथे आम्हा दोघांमध्ये काय घडलं हे लिहायला मला लाज वाटते….. समजून घ्या.
बुलबुल
दिनांक २ एप्रिल २०२२