बुलबुल ची रोजनिशी ६
आज एक नवीनच संकट निर्माण झालं.
सकाळी आमची ही घर रुळण्यासाठी घरट्यात शांत बसली होती आणि अचानकपणे तिच्या डोळ्यावर झगमगाट झाल्यासारखं झालं. क्षणभर ती घाबरली. पण दोन मिनिटांनी तिने किलकिल्या डोळ्यांनी पाहिलं तर शेजारचे काका निर्लज्ज पणे आमच्या हिचे फोटो काढत होते.
तिच्या अंगाचा तिळपापड तर झालाच पण मला समजलं तेव्हा मला पण चीड आली.
आमच्या “प्रायव्हसीचं” यांना काहीच कसं वाटतं नाही ? अजून तर हिची डिलीव्हरी पण व्हायची आहे.
आपल्या पिल्लांचे फोटो त्यांनी व्हायरल केले तर ? एक ना अनेक शंका मनात दाटून आल्या.

नशीब आमची ही काल मला आंब्याच्या झाडाच्या गर्द झाडीत घेऊन गेली…… नाहीतर यांनी आमचे कसले कसले फोटो असते.
असो. उद्या काकांना समज द्यावी लागेल असं दिसतंय….
बुलबुल
दिनांक ४ एप्रिल २०२२