बुलबुल ची रोजनिशी १५
आमच्या घरट्याच्या अगदी जवळ काकांचं चिक्कूचं झाड आहे. चिक्कू मस्त साखरे सारखे गोड आहेत. मला त्यांचा गर पटापट आणून पिल्लांना भरवणं सोपं वाटत होतं (आणि मधे मधे मला पण माझ्या आवडीचं गोड खायला मिळत होतं). पण हिच्या चाणाक्ष नजरेतून हे काही सुटलं नाही. माझ्यावर खेकसलीच.

म्हणाली — पिल्लांना उगाच एवढी गोडाची चटक लावू नका. नुसतीच जाडी ढोली होतील….आणि शिवाय किडे मकोडे खायला नाही शिकली तर मग प्रोटीन्सचं काय ?
हिचं आहारज्ञान बुलबुलीमंडळात जावून बरंच सुधारलंय.
मी आपला गपगुमान किडे शोधायच्या नावाखाली काढता पंख घेतला.
बुलबुल
१३ एप्रिल २०२२.
बुलबुल ची रोजनिशी १६
पिल्लांना दिवसभर खायला घालण्यात आज एवढी दमछाक झालीय की रोजनिशी लिहायला काही त्राणंच उरले नाहीयेत. शत्रूंवर सतत पाळत ठेवायची आणि घरट्यात पिल्लांनी केलेली शी वेळच्या वेळी साफ करत रहायचं….एक ना अनेक कामं. पिल्लांच्या मागे दिवस सुरू कधी होतो आणि संपतो कधी कळतच नाही !
पिल्लांना भरवायचा तसा मला कंटाळा नाहीये पण आज गमतीने मी हिला म्हटलं की आपली पिल्लं खूपच खादाड आहेत बुवा! मी म्हटलं नुसतं……तर हिने डोळे वटारले. “उगीच नावं नका ठेवू आपल्या पिल्लांना. वाढत्या वयात भूक जास्तच असते पिल्लांची. थोडेच दिवस अजून. मग आपल्या आपण खायला शिकतील.”

एकंदरीत काय… आयांना आपल्या पिल्लांवर कोणीही विनोद केलेला अजिबात खपत नाही असं माझ्या लक्षात आलं. पिल्लांच्या बापाने पण केलेला विनोद सुद्धा.
आज आणखी एक गंमत झाली.
आज पिल्लांनी हळू आवाजात चिवचिव करायला सुरुवात केली तशी हिने लगेच जाहीर करून टाकलं की पिल्लांनी तिला हाक मारायला सुरुवात केलीय ! आमच्या भाषेत ‘चि’ म्हणजे आई. सर्वसाधारणपणे पिल्लं जे पहिले आवाज करतात ना ते आवाज आपल्या आईलाच हाक मारणं असतं असा निसर्गातल्या सर्व आयांचा दावा असतो.
मी आता पेंगायला सुरुवात केलीय आणि ही पिल्लांवर पांघरूण घालण्यासाठी घरट्यात जावून बसलीय….
बुलबुल
१४ एप्रिल २०२२.