बुलबुल ची रोजनिशी १७
आज दिवसभर पिल्लांची बडबड चालू होती.
त्यांना घरट्यातून बाहेर बरंच काही दिसत होतं आणि त्या सर्व गोष्टींबद्दल त्यांना कुतूहल होतं.
चि… म्हणजे आमची ‘ही’ त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं देत होती. संभाषण खूप मजेदार होतं.
उदाहरणार्थ….
छोटं पिल्लू: आपल्या घराबाहेर हे सगळं हिरवगार काय आहे ?
चि: ती सगळी झाडं आहेत.
छोटं पिल्लू: ती कुणाची आहेत ?
चि: आपल्या सर्वांची. आपल्याला ती खाऊ देतात.
छोटं पिल्लू: (मान वर करून) ते निळं काय आहे ?
चि: आकाश.
छोटं पिल्लू: ते कशासाठी आहे ?
चि: आपल्याला उडण्यासाठी आहे.
छोटं पिल्लू: ते कोणाचं आहे ?
चि: ते पण आपल्या सगळ्यांंचं आहे.
छोटं पिल्लू: तुम्ही घरट्यातून सारखं सारखं कुठे जाता ?
चि: आम्ही तुमच्या साठी खाऊ आणायला जातो.
इतका वेळ शांत बसलेलं मोठं पिल्लू बोललं… “आम्हाला पण तुमच्या सारखं भुर्रकन घरट्यातून बाहेर उडत जायचंय. तू आम्हाला उडायला शिकवणार का आम्हाला त्यासाठी कुठच्या तरी शाळेत घालणार ?”
चि हसत हसत म्हणाली, बाळांनो तुम्हाला सगळं काही आपोआप जमेल. आणि हो…आपण काय खावं ? काय खावू नये? आपले मित्र कोण आणि शत्रू कोण? या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआपच समजत जातील. तुम्हाला त्या साठी शाळेत घालायला तुम्ही काय माणसांची पिल्लं थोडीच आहात ?
छोटं पिल्लू: माणूस कोण आहे ?
चि: तो दोन पायांवर चालणारा प्राणी आहे. तो जमिनीवर राहतो. पण लक्षात ठेवा. आपण त्यांच्या पासून दूर उंचावर आकाशात रहायचं.
छोटं पिल्लू: का ?
चि: कारण तो आपल्या बरोबर असं वागेल याचा काही नेम नाही…फारच बेभरवशी.
हे बोलणं चालू होतं तेवढ्यात तिला शेजारचे काका खिडकीत उभे दिसले. तिने पिल्लांना त्यांच्याकडे चोच करून दाखवलं आणि पिल्लांची बोलतीच बंद झाली !
आज दिवसभर दोन्ही पिल्लं आपल्या नाजूक पंखांचे सतत व्यायाम करत होती. सारखी धडपड सुरू होती घरट्याबाहेर काय आहे पहायची. एका पिल्लाने तर घरट्याच्या काठावर चढायचा प्रयत्न केला.घरट्याच्या बाहेर पडायची केवढी ती धडपड! बरं झालं मी शेजारीच बसलो होतो. लगेचच त्याच्यावर डोळे वटारून त्याला आत ढकललं.
पण एकंदरीतच दोघांचीही प्रगती खूपच चांगली आहे.
बुलबुल
१५ एप्रिल २०२२
लबुल ची रोजनिशी १८
हुर्र~~~~रे~~~~!
शेवटी आज सकाळी सकाळी दोन्ही पिल्लांनी घरट्यातून साडे माडे तीन करत बाहेर धडाधड उड्या मारल्याच.
नशीब इथे दाट झाडी आहे त्यामुळे दोन्ही पिल्लं खूप उंचावर राहिली.
धड उडता येत नव्हतं ना तोल सावरता येत होता. पण आत्मविश्वास केवढा ? दोन तीन वेळा फांदीला नीट पकडता आलं नाही म्हणून थोडी गडबड नक्कीच झाली. पण मग थोड्या वेळाने एका फांदीवर तोल सावरून नीट बसता यायला लागलं.
आम्ही दोघेही पिल्लांना छोट्या छोट्या उड्या कशा मारायच्या किंवा पंख कसे फडफडवले तर उडता येईल याचं प्रात्यक्षिक दिवसभर करून दाखवत होतो. चुकून जर कोणी आम्हाला असं करताना पाहिलं असतं ना तर त्यांना नक्कीच हसू आलं असतं कारण आम्हाला पिल्लांसमोर पाठमोरं राहून ती हालचाल करून दाखवावी लागत होती !
पिल्लांना खाऊ घालत रहायचं, शिकवायचं, प्रोत्साहन द्यायचं आणि मुख्य म्हणजे बोक्यावर पण लक्ष ठेवायचं यात आजचा दिवस खूपच गडबडीत गेला. पण आपली पिल्लं मोठी झाल्याचा आनंद आणि समाधान काही वेगळंच आहे !
आजचा संपूर्ण दिवस काकांच्या घरचा परिसर फक्त आमच्याच आवाजाने भरून गेला होता.
मजल दर मजल करत संध्याकाळपर्यंत पिल्लांनी शेजारच्या जाधवांचं आंब्याचं छोटं झाड गाठलं पण.
चला…. आता अजून दोन तीन दिवस पिल्लांची घरट्याबाहेर काळजी घेतली की आमचं काम संपेल असं वाटतंय.
बुलबुल
१६ एप्रिल २०२२.