बुलबुल ची रोजनिशी १९
आमच्या कालच्या गडबडीवरून बिबुशेटला कळलं होतं की आम्ही घर रिकामं केलंय. सकाळी सकाळी आपल्या बायकोला घेऊन माझ्याकडे आला. त्यांना आमचं रिकामं घर वापरायला हवं होतं. आमच्यात आपलं घर आपण रिकामं केलं की दुसऱ्या कुटुंबाला वापरायला द्यायची पद्धत आहे (शिवाय त्यात बिबुशेटची बायको पण मला खूप आवडते) त्यामुळे त्यांना नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.
घराचा ताबा देण्यासाठी आम्ही तिघेही मग आमच्या घरट्याकडे गेलो. कालच्या गडबडीत केळीच्या पानाला लावलेला टाका निसटून घरट्यावरचं पॅव्हेलियन थोडं सरकलं होतं पण बिबुशेटची बायको बिनधास्त आहे त्यामुळे तिने उगाचच त्याचा फारसा बाऊ केला नाही.
घरट्याचा ताबा देऊन आम्ही निघणारच होतो तेव्हढ्यात माझं लक्ष काकांच्या खिडकीकडे गेलं. काका आणि काकू दोघेही स्तब्ध होऊन आमचं रिकामं घरटं टक लावून पहात होते. काकूंचा रडवेला चेहरा पाहून त्यांना कशाचं तरी अनावर दुःख झाल्यासारखं दिसत होतं.
तेवढ्यात काकूंनी आमच्या रिकाम्या घरट्याकडे बोट दाखवलं आणि काकांना म्हणाल्या Empty Nest Syndrome…..हे बोलल्यावर तर त्यांचा चेहरा अजूनच दुःखी झाला.

हा सगळा प्रकार पाहून मी मात्र गोंधळात पडलो. बिबुशेटला खिडकीकडे चोच करून दाखवलं आणि म्हटलं की आपली पिल्लं घरट्यातून बाहेर पडलीत म्हणून आपण तर किती जाम खुश आहोत मग काका काकूंना का वाईट वाटतंय ?
बिबुशेट क्षणभर विचार करुन म्हणाला…..”अरे, त्यांना कदाचित त्यांचं पिल्लू त्यांच्या घरट्यातून उडून गेल्याच्या दिवसाची आठवण येत असेल बघ.”
त्याच्या या उत्तराने तर माझा गोंधळ अजूनच वाढला. मी म्हणालो की पिल्लू घरट्यातून उडून गेलं यात दुःख कसलं ? पिल्लाला त्यांनी सुद्धा मोठं केलं असेल ते सुद्धा मुळात घरट्यातून उडून जायलाच ना ?
बिबुशेट म्हणाला…”ते खरंय रे. पण या माणसांना ना आपलं पिल्लू खूप मोठं व्हावं आणि त्याने सगळं जग जिंकावं असं जरी वाटत असलं ना तरीही ते रहावं मात्र आपल्या घरट्यात आणि आपल्याच बरोबर असंही वाटत असतं बघ. पिल्लू घरट्याबाहेर गेलं तरीही परत परत त्याने आपल्या घरी येत रहावं असंच वाटत असतं त्यांना.”
मी: हे कसं शक्य आहे ?
बिबुशेट: हे बघ. तुला जे कळतंय ना ते त्यांनाही कळत असतं रे पण वळत नाही…..
आमचं संभाषण सुरू असताना काका आणि काकू अजूनही तिथेच खिडकीत उभे होते. नि:शब्द.
बघता बघता काकांनी हळूच आपला हुंदका आवरला आणि पाणावलेल्या डोळ्यांनी काकूंकडे पाहिलं….. तोपर्यंत काकूंच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर लोटला होता……
आम्ही तिघेही तिथून उडून गेलो.
बुलबुल
दिनांक १७ एप्रिल २०२२.
समाप्त.