बूड : उपेक्षेचा तळ……डॉक्टर करंबेळकर राजेंद्र

बूड : उपेक्षेचा तळ
(वाचन वेळ: सुमारे* पाच मिनीटे)…(* सुमार लेखन आहे म्हणून….)

“बिनबुडाचे आरोप शोभणारे नाहीत”
“एका सन्माननीय सुसंस्कृत कुटुंबातील व्यक्तीकडून (म्हणजे देवेंद्राकडून) हे आरोप करणारे विधान होईल ही अपेक्षा नव्हती”…. इति-दुसरी सन्माननीय व्यक्ती (म्हणजे ताई).

वर्तमान पत्रातलं बातमीचं हे शिर्षक वाचून गंमत वाटली. मनात आलं. बिनबुडाचे आरोपच काय पण बिनबुडाचं दुसरं कुठे काय शोभतं ?

पण काहीही म्हणा जन्मभर आपल्यावर कसलाही आणि कितीही भार सोसून सुद्धा बूड हे थोडंसं उपेक्षितच राहिलेलं आहे असं मला वाटलं. बिचारं बूड.

एखादा तरुण आपल्या उमेदीच्या वयात वारंवार नोकरी बदलत राहिला किंवा वेगवेगळे व्यवसाय बदलत राहिला तर त्याच्या सन्माननीय पालकांकडून त्याला “आता कुठेतरी एकाच ठिकाणी बूड स्थिर कर” असा मौलिक सल्ला नक्कीच मिळाला असता. पण व्यवसायात यश मिळाल्यावर मात्र ती व्यक्ती एखाद्या समारंभात किंवा सार्वजनिकरीत्या “माझ्या यशाचं श्रेय हे संपूर्णपणे माझ्या बूडालाच आहे” असं म्हणताना मात्र दिसत नाही. तिथे त्या यशाचं श्रेय ‘त्याची मेहनत, सचोटी, कल्पकता, मेंदू, डोकं …इथपासून ते थोरामोठ्यांचे आशिर्वाद’ इ. पर्यंत सगळेजण खाऊन जातात.

तीच गोष्ट लग्नाची. लग्नाचं स्थळ शोधताना ‘मुलाचं बूड स्थिर’ असल्याशिवाय स्थळ आणि बोलणी पुढे सरकतच नाही. पण एकदा का सुखी संसाराला सुरुवात झाली की मग त्या संसाराचं श्रेय कुणी त्या बूडाला दिलंय ?

आमच्या लहानपणी मुलांच्या खेळण्यांच्या संग्रहात एक जड बुडाची बाहुली नक्की असायची. कितीही आडवं केलं तरी चटकन परत उभी रहाणारी. अर्थात ती बाहुली मुलांना खेळायला देण्यामागे मोठ्या माणसांचा काही हेतू असायचा का हे माहित नाही. पण तसा हेतू असताच तर काही निष्कर्ष असेही निघाले असते जसे की मुलांना बूडाचं महत्त्व समजावं, आयुष्यात नियतीने कितीही वेळा आडवं केलं तरीही बूड जर मजबूत असेल तर तुम्ही चटकन सावरू शकाल हा धडा मिळावा, बूड जितकं जड तितकं चांगलं (!) वगैरे वगैरे. पण आज-काल मुलांच्या खेळण्यात ही जड बुडाची बाहुली क्वचितच दिसते. मुलांना खेळायला फोन, टॅब, संगणक इत्यादी गोष्टी दिल्या तर बूडाचं महत्त्व कळणार कसं त्यांना असा साहजिकच प्रश्न पडतो? नाही म्हणायला बाबाच्या फोनमधे त्यांना चुकून कधीतरी (अपघाती) वेगळ्याच जड बुडाच्या बाहुल्या आढळतात पण तो विषय वेगळाच आहे.

शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून बुडाकडे पाहिलं तर (तत्पूर्वी एक वैधानिक इशारा: कोणत्याही ‘दृष्टि’ किंवा ‘कोनातून’ कोणाचेही बूड पाहणे हे आरोग्यास अपायकारक आहे. ‘अ-पाय’ कारक, कारण कुणीतरी तुमचं तंगडं मोडून हातात देऊ शकतो) आपण जे ‘टेकतो’ ते ‘बूड’ असं म्हटलं तर हा भार आपली दोन इस्चियल ट्युबराॅसिटीज् (ischial tuberosities) नावाची हाडं आणि त्या हाडांवरचा शरीराचा भाग पेलत असतात. (चुभूदेघे). आणि जन्मभर लोकांची (अतोनात वाढलेली) वजनं सहन करून देखील या हाडांच्या तशा फारशा काही तक्रारी किंवा व्याधी मात्र नसतात. सांध्यांसारखी कुरकुर पण नसते. निदान एवढ्यासाठी तरी आपण त्यांचे खरंच आभार मानायला हवेत की नाही ?

या हाडांवरून आणखीन एक विनोदी गोष्ट आठवली. एमबीबीएस करताना पहिल्या वर्षाच्या अंतिम परिक्षेतली. (हे ‘वर्ष’ चक्क ‘दीड वर्षाचं’ असायचं तरीपण आम्ही त्याला वर्षच म्हणायचो. जावू दे. डॉक्टर लोकांना नाहीतरी आकडेमोड फारशी कळत नाही !) तिथे शरीरातली सगळी हाडं एका टेबलावर बाजार मांडलाय असं वाटावं अशी मांडून ठेवून त्या हाडांवर एक तोंडी परीक्षा व्हायची. परीक्षक त्यातलंच एखादं हाड विद्यार्थ्यांकडे आपल्या हातात पकडलेल्या पायाच्या हाडाने सरकवतच प्रश्न विचारत.
त्या काळात, परीक्षक किती विचित्र आणि अतार्किक प्रश्न विचारत यावरचा एक विनोदी किस्सा आम्हाला नेहमी सांगितला जायचा. तो असा.

परीक्षक मुलाच्या हातात पेल्विस (मराठीत त्याला ‘श्रोणि’चं हाड म्हणतात. बरं झालं शरीरशास्त्र मराठीत शिकावं नाही लागलं नाहीतर अवघड उच्चार करताना जिभेचं हाड मोडलं असतं…) देऊन त्या दोघांमधे संभाषण सुरू होतं.
परीक्षक: मला सांग तू कशावर बसलायस ?
विद्यार्थी: (थोडसं आश्चर्याने) स्टूलावर !
परीक्षक: अरे..तू नक्की कशावर बसलायस ?
विद्यार्थी: (आता टरकली. फायनल परीक्षा आहे ना? परीक्षकाला नक्की काय उत्तर अपेक्षित आहे ?) स्टूल नीट निरखून पहात….”सर, लाकडी स्टूल सर.”
परीक्षक (अ-मराठी)…: कम ऑन. अरे तू कुठल्या हाडांवर बसलायस ?
विद्यार्थी ताडकन उभं राहून आपण स्टूल वर बसण्यापूर्वी तिथे चुकून एखादं छोटं हाड आधीच तर पडलं नव्हतं ना याची खात्री करत…”नो सर. मी कुठल्याच हाडांवर बसलो नाहीये”…..
क्षणभर त्याला आपण घरीच आहोत आणि आपण वेंधळेपणाने आईने स्टूलावर वाळत घातलेल्या कुटाच्या मिरच्यांवर बसलोय आणि ती खेकसून सांगतेय….अरे, कशावर बसलायस? जरा नीट पहावं तरी माणसाने….
हा सगळा प्रकार चाललेला असताना तिथे शेजारी बसलेला एक्स्पर्ट मात्र का हसत होता हे काही त्याच्या लक्षात येईना… तेवढ्यात परीक्षकाने आपला संयम संपल्याचं जाहीर करत आपला फैसला सुनावला…
परीक्षक: “तू आता जावू शकतोस…..पुढच्या वेळी नीट तयारी करून ये…”
विद्यार्थी रडवेल्या चेहर्‍याने बाहेर.
बिचाऱ्याला परीक्षकाच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून त्याने हातात दिलेल्या पेल्विक बोन वरच्या इस्चियल ट्युबराॅसिटीज् दाखवायच्या होत्या याची पुसट सुद्धा कल्पना नव्हती.

लग्नाला जसं ‘स्थिर’ बुडाचं स्थळ लागतं तसं संसारात लागणाऱ्या काही भांड्याचं बूड पण महत्त्वाचं असतं. काही भांडी जाड बुडाचीच असावी लागतात. विषेशतः पातेली. पिंप मोठ्या बुडाचं असावं लागतं तर घागर सपाट बुडाची हवी. तर गंगाजल साठवायला छोटा ‘बुडकुला’ हवा असतो. (तसं बुडकुला हा शब्द ‘खरी फॅक्ट’ सारखा वाटतो नाही ?)
बूड चेपलं तर भांडं बदलायची वेळ येते. नशीब, माणसांच्या बाबतीत तसं नसतं !

पाण्यात तरंगताना एखाद्या व्यक्तीचा पृष्ठभाग जोवर दिसतोय तोपर्यंत तो तरंगतोय पण पृष्ठभाग दिसेनासा झाला कि समजायचं….तो बुड-ला. शब्दकोशात पाहिलं तर बूड या शब्दावरून इतर अनेक शब्द निर्माण झाले आहेत असं दिसतं. आणि तसं तर बूड या शब्दाचे सुद्धा अनेक अर्थ आहेत म्हणे. पण बुडबुडा हा शब्द मात्र बुडावरून आलेला दिसत नाही…मग तो बुडाच्या कितीही जवळ आला तरीही.

मराठी साहित्यात अगदी संतांच्या भारुडापासून ते हल्लीच्या लेखकांपर्यंत अनेक जणांनी बूड या शब्दाचा नैमित्तिक वापर केलाय असं गुगल सर्च वर दिसतं. पण तो वापर प्रामुख्याने बूड टेकणे, बूड उचलून पळून जाणे, कुणाच्या तरी तावडीत बूड सापडणे किंवा बूड स्थिर होणे इ. साठीच. आजकाल हे ‘बिनबुडाचे’ आरोप पण आहेतच. पण काही अंशात आश्चर्य आणि वाईट एवढ्याचंच वाटतं की इंटरनेट वरच्या मराठी शब्दकोशात बूड या शब्दाच्या अनेक अर्थांमधे बूड या शब्दाचा ‘आपल्या/मानवी शरीराचा एक भाग’ असा मात्र उल्लेख दिसला नाही. अहो, हे म्हणजे सरळ सरळ उघडपणे त्या भागाला नाकबूल करण्यासारखं झालं. म्हणजे पहा ना ? एखाद्याने मारलेली लाथ खायला बूड सर्वात पुढे असतं….नाही, म्हणजे मागे असतं…. पण तरीही बूड हा आपल्या शरीराचा भाग नाहीच ???
यापेक्षा आणखीन काय बरं मोठी उपेक्षा असू शकेल त्याची ?

डॉक्टर करंबेळकर राजेंद्र
(11-03-2023)
9890428837.

Dr Rajendra Karambelkar is a senior paediatrician of repute practising at Pimpri Chinchwad. He has a flair for writing and a good and mature sense of humor

Published by Dr. K Anil Roy

Medical doctor, partly atheist but believes there is a god, anti establishment, renegade, proud to be an Indian, an awakened one,!! Tolerant to criticism

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: