बुलबुल ची रोजनिशी ६……Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ६

आज एक नवीनच संकट निर्माण झालं. 

सकाळी आमची ही घर रुळण्यासाठी घरट्यात शांत बसली होती‌ आणि अचानकपणे तिच्या डोळ्यावर झगमगाट झाल्यासारखं झालं. क्षणभर ती घाबरली. पण  दोन मिनिटांनी तिने किलकिल्या डोळ्यांनी पाहिलं तर शेजारचे काका निर्लज्ज पणे आमच्या हिचे फोटो काढत होते. 

तिच्या अंगाचा तिळपापड तर झालाच पण मला समजलं तेव्हा मला पण चीड आली. 

आमच्या “प्रायव्हसीचं” यांना काहीच कसं वाटतं नाही ? अजून तर हिची डिलीव्हरी पण व्हायची आहे. 

आपल्या पिल्लांचे फोटो त्यांनी व्हायरल केले तर ? एक ना अनेक शंका मनात दाटून आल्या.

नशीब आमची ही काल मला आंब्याच्या झाडाच्या गर्द झाडीत घेऊन गेली…… नाहीतर यांनी आमचे कसले कसले फोटो असते.

असो. उद्या काकांना समज द्यावी लागेल असं दिसतंय….

बुलबुल

दिनांक ४ एप्रिल २०२२

बुलबुल ची रोजनिशी ५……Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ५

कालच्या रोमांचक अनुभवाची नशा एवढी होती की आज संध्याकाळपर्यंत घर जवळजवळ पूर्ण बांधून पण झालं. आमचं घर ना 1 BHC … आहे. म्हणजे ” एक बुलबुल (फॅमिली) होल्डिंग कपॅसिटी” आहे. मस्त अर्धगोलाकार आहे… आणि अख्खं घर कव्हर्ड आहे. आणि ही म्हणाली की आपल्या पिल्लांना नक्की पुरून उरेल. 

आणखी एक गंमत सांगण्यासारखी आहे. तसं तर घर all spice च्या फांदीवरच आहे आणि बिबुशेटने काहितरी “पोरांच्या इम्युनिटी साठी पुरक आहे” असं पण सांगितलं होतं. पण हिची दूरदृष्टी बघा….. म्हणाली शेजारच्या काकूंनी फोडणी घातली की इथे आपल्याला ठसका लागतो तर आपल्या पोरांचं काय ? कुठूनतरी शोधुन एक वाळलेली वेगळीच दिसणारी काडी आणून घरट्याला खोचून ठेवली. मी म्हटलं हे काय ? तर म्हणाली तुळशीची मंजिरी आहे. खोकल्यावर रामबाण ! तुम्हाला सांगतो आमच्या हिचं संसाराचं ज्ञान वाखाणण्याजोगं आहे.

असो. तर आमचं घर फक्त तीन दिवसातच बांधून झालं. पण मी पाहिलंय शेजारचे कुलकर्णी तीन वर्ष घर बांधत होते….. मला एक प्रश्न पडतो की माणसं आपल्या एक आणि दोन पिल्लांसाठी एव्हडी मोठ्ठी घरं कशासाठी बांधतात ?

बुलबुल

दिनांक ३ एप्रिल २०२२.

बुलबुल ची रोजनिशी ४……Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ४

सुदैवाने घर बांधायला हवं असलेलं साहित्य इथे जवळच उपलब्ध आहे. शिवाय आम्हाला घर बांधायला कसलीही परवानगी लागत‌ नाही. आर्किटेक्ट तर मुळीच नाही. 

आम्ही पटपट घर बांधायला सुरुवात केली आणि गुडघाभर उंच बांधलं पण आणि मग एक गम्मत झाली.

आमची ही म्हणाली…” अहो आपलं घर तर पुढच्या दोन तीन दिवसात पूर्ण होईल….

मी: मग ?

ही: अहो मग पुढची तयारी करायला नको का वेळेतच ?

मी: म्हणजे ?

ही: अहो म्हणजे घर बांधून काय आपल्याला त्यात थोडंच रहायचं आहे !

मी: मग ?

ही: तुम्हाला ना….. काहिच कळत नाही !!!

ही एकदम लाजली आणि लाजेने चूर होऊन काही तरी बोलत भुर्रकन शेजारच्या आंब्याच्या झाडीत गायब झाली. मला त्या क्षणी काय झालं ते कळायच्या आत मी पण तिच्या मागोमाग गेलो.

……………………………..

तिथे आम्हा दोघांमध्ये काय घडलं हे लिहायला मला लाज वाटते….. समजून घ्या.

बुलबुल

दिनांक २ एप्रिल २०२२

बुलबुल ची रोजनिशी ३….Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ३

काय सांगू तुम्हाला, प्लॉट वरची पॅव्हेलियन ची सावली बघून बायको एकदम खूश !

मला म्हणाली काल तू जेवला नसशील या गडबडीत.आज तू आराम कर.

आणि मग पहाता पहाता तिने ‘मुहूर्तमेढ’ ठेवली. बाजुला छोट्या छोट्या काड्या ठेवल्या आणि मग कुठून तरी कापूस आणून जोतं नीट बांधलं. 

लग्नापूर्वी हिला बघायला गेलो होतो तेव्हा बघण्याच्या कार्यक्रमात हिची आई मोठ्या कौतुकाने म्हणाली होती..‌”आमची बाळी की नई एका सुईवर पण विणकाम छान करते बरं का !”आज हिने आपल्या आईचे शब्द खरे करून दाखवले. 

महत्वाचं म्हणजे आता घरासाठी जागा पसंत पडली का म्हणून विचारायची गरजच नाही.

मित्रांनो, आता पुढे काही दिवस आमचा पत्ता…

मुक्काम पोस्ट….ऑल स्पाइस !

चौथी फांदी, हवेत १२ फूट उंचीवर.

आपला

बुलबुल

दिनांक १ एप्रिल २०२२.

बुलबुल ची रोजनिशी २…..Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी २

आज सकाळी माझ्या एका अनुभवी मित्राला जागा दाखवायला घेऊन गेलो. त्याचं टोपणनाव ‘बिबुशेठ’. त्याचा तुरा आम्हा सर्वांमध्ये मोठा. त्याने आत्तापर्यंत तीन चार घरं बांधली म्हणतात. शिवाय दोघी तिघी बुलबुलींबरोबर संसार पण केलाय‌! त्याचा ‘हा’ अनुभव जास्त महत्वाचा होता.

प्लॉट ‘अॉल स्पाइस’ झाडावर आहे हे पाहून तो खूप खुश  झाला. वातावरणात मसाल्याचा मस्त वास होता. जोरात श्वास घेत म्हणाला ‘झाडाच्या पानांच्या मसाल्याच्या वासाने पोरांची इम्युनिटी मजबूत होईल बघ’. मी कसंबसं सावरत म्हणालो “बिबुशेठ… मसाल्याचा वास शेजारच्या काकूंनी घातलेल्या फोडणीचा आहे.” 

पण बिबुशेठने मान वाकडी करून असहमती दाखवली.

असो. मी म्हटलं ते सोड, बायकोला उन्हात पोरं काळी व्हायची चिंता आहे. तू माझ्या बायकोचं मन वळवशील का ?

बिबुशेठ किंचाळत म्हणाला… बायकोचं ? आणि मन वळवायचं ??? यडा झाला का काय?????

खूप वेळ वेडी वाकडी मान करत  राहिला. तो गंभीर झाला की असंच करतो. थोड्या वेळाने मग एकदम चित्कारत म्हणाला ” बायकोचं मन वळवण्यापेक्षा तू त्या केळीचं पान का नाही वळवत? छान सावली होईल”…….. 

प्रयत्न करायला काहिच हरकत नव्हती.

पान वाकवणं सोपं नव्हतं. मान वाकडी करून करून मोडायची वेळ आली. पण बायकोवर छाप तर पाडायची होती ना? मनात म्हटलं…हम भी कुछ कम नहीं ! (आमच्यात हिंदी भाषा वापरण्याची क्रेझ आहे बरं का. माझ्या माहितीप्रमाणे हिंदी चित्रपटांमध्ये आमच्यावर लिहिलेली कित्येक गाणी खूप गाजली आहेत !)

(पुढचा मजकूर पुढच्या फोटो नंतर)

बलु बलु…..Part one….Dr Rajendra Karambelkar

बुलबुलची रोजनिशी                         

    बऱ्याच दिवसांपासून बायकोची भुणभूण चालू होती की लवकर घर बांधू पण तिला आवडेल अशी जागा मिळत नव्हती. आज पेपर मधली जाहिरात वाचली की  “बनाना रिपब्लिक” मध्ये काही जागा उपलब्ध आहेत. बायकोला जागा आवडली पण डायरेक्ट उन्हात आपली पोरं काळी होतील अशी तिला भिती वाटते.  

        लाईट (रात्री लागलाच तर करंबेळकर कुटुंबाच्या खिडकीतून येईल) आणि पाणी (त्यांच्या टाकीतून ओव्हरफ्लो होणारं) याची सोय आहे. शिवाय जागा ‘रोडटच’ नाहिये त्यामुळे आगंतुकांची भिती पण नाही. ( शिवाय आम्ही दोघेही पुण्याचेच!)     

पण सावलीचा बंदोबस्त करावा लागेल. हिला कळत नाही का की नाहीतरी आपण काळ्या गालाचेच आहोत….. पण ऐकायची नाही.           उद्या काहीतरी करावं लागेल…..           बुलबुल       ……..  30 एप्रिल 2022.

शिवीगाळ एक चिंतन (भाग आठ)शिवीगाळ: भविष्यातील अस्तित्व….Dr Rajendra Karambelkar

शिवीगाळ एक चिंतन (भाग आठ)

शिवीगाळ: भविष्यातील अस्तित्व

भविष्यात शिव्यांचं वर्गीकरण कायदेशीर शिव्या आणि बेकायदेशीर शिव्या असं होईल असा माझा अंदाज आहे. विश्वास बसत नसेल तर आपल्या संसदेतील वादविवादच पहा. संसदेत वादविवाद घालताना वक्त्याला कोणते शब्द वापरायची परवानगी आहे आणि कोणते शब्द ‘अ-सांसदीय’ आहेत (अपशब्दांचं/शिव्यांचं हे गोंडस नाव) हे नियम आहेत. आणि कालबद्ध पद्धतीने वेगवगळे अपशब्द तिथे नॉर्मल म्हणून सर्व संमतीने स्वीकारले जातात. तिथेही रस्त्यावरच्या भांडणांसारखी भांडणं होत असतात. कायदे बनवणारे आपले प्रतिनिधि आरडाओरड तर करतातच पण एकमेकांवर कागदाचे बोळे, पुस्तकं, सहजगत्या उचकटता आले तर माईक किंवा खुर्च्यासुद्धा ऐकमेकांना फेकून मारतात. आपापसातले मतभेद कसे सोडवायचे असतात ह्याचं जणू एक आदर्श उदाहरण सर्व जनतेला कोणतीही लाज न बाळगता (तिथे ‘निर्लज्ज’ हा शब्द वापरलेला चालत नाही) आपले सांसद दाखवत असतात. अर्थात तिथली एक गंमत रस्त्यावर मात्र वापरता येत नाही. पीठासीन अध्यक्षाला न आवडलेले अपशब्द संसदेच्या ‘काम’काजाच्या (तिथे भांडणं जास्त आणि काम कमी ..त्यामुळे नक्की काय काम केलं किंवा काम झालं यापेक्षा वादविवाद झाला यातच त्यांना रस असतो) रेकॉर्ड मधून ‘काढून टाकले’ की भांडण मिटतं…रस्त्यावर मात्र दोन चार दात काढले तरीसुद्धा विषय संपेल याची खात्री नसते.

आजकाल न्यायव्यवस्था सुध्दा या विषयावर सतत नजर ठेवून आहे. दुकानात वेगवेगळे आयटेम खरेदी करता येतात, सिनेमातल्या लोकप्रिय गाण्याला आयटेम साँग म्हटलेलं चालतं पण एखाद्या आयटेम साँग करणार्‍या/किंवा तसं दिसणार्‍या तरुणीला ‘आयटेम’ म्हणता येत नाही. असं म्हटल्या बद्दल एका महाभागाला चक्क दीड वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली गेल्या आठवडय़ात! तेव्हा सर्वांनीच थोडं सावध रहायला पाहिजे आता.

काड्या करणे आणि काड्या लावणे याची महान परंपरा आपल्याला लाभली आहे. काही लोकांना शांतता अजिबात सहनच होत नाही. आता हेच पहा… भगवान महादेव कैलास पर्वतावर शांतपणे समाधी लावून बसलेत. तिकडे पार्वती हा भोलेबाबा कधी एकदा डोळे उघडणार म्हणून वाट बघत बसलीय. तेवढ्यात मदनाला कोणीतरी चुगली करायला सांगतं आणि तो बिनधास्त डायरेक्ट महादेवावर बाण मारून मोकळा पण होतो….पुढे जो काही जाळ महादेवाने काढला त्यात मदनच गायब ! काड्या करणं ही तिथपासूनची पारंपरिक आहे.

पण आजकालचे काड्या लावणारे लोक मात्र फारच हुशार झालेत. ते स्वतः पेटत नाहीत. फक्त पेटवत रहातात आणि दुरून मजा पाहत बसतात. उदा. बातम्यांच्या बहुतांश टिव्ही चॅनेल वर त्यांचे वार्ताहर, वृत्त संपादक आणि अँकर दिवस रात्र ‘ब्रेकींग न्यूज’ पेक्षा ‘ब्रेकींग पीस’चंच काम जास्त प्रमाणात करतात. आणि गंमत म्हणजे प्रत्येक घटनेला कुणितरी व्यक्ती जबाबदार असायलाच हवं (त्यात ती राजकारणी व्यक्ती असेल तर अहो भाग्य) हा त्यांचा हेका मती गुंग करणारा असतो…. अगदी आकाशातून कोसळलेल्या विजेमुळे झालेला अपघात का असेना मग ? यांचा प्रश्न असतो की सरकारने विजा कोसळू नयेत यासाठी काय पावलं उचलली? वीज विदर्भातच का कोसळली पश्चिम महाराष्ट्रात का नाही ? वीज कोसळण्यापूर्वी तिथे कोणते राजकीय नेते गेले होते आणि त्यांनी तिथे नक्की काय केलं? ते तिथून वीज कोसळण्यापूर्वी कसे वेळेत निघून गेले ? इ. इ. आणखी गंमत म्हणजे त्या प्रश्नावर सरकारचा प्रतिप्रश्न असतो की आधीच्या सरकारने तरी त्यासाठी काय केलं ? आणि हे एवढं सगळं मनोरंजन कमी की काय म्हणून न्यायव्यवस्था suo motu action घेऊन सरकारला नोटीस बजावते की अशा दुर्घटना (आकाशातून वीज कोसळणे) परत घडू नयेत यासाठी सरकार कोणती पावले उचलणार आहे ?….हे आहे आपलं प्राईम टाईम मनोरंजन!

ही सर्व माणसं ‘भांडण संस्कृतीचं’ संवर्धन जरूर करतात पण टीव्हीवर शिवीगाळ करायला बंधन असल्यामुळे ‘शिवीगाळ शब्दसंग्रहात’ मात्र त्याने फारशी भर पडत नाही असं म्हणावं लागेल. पण शेवट भांडणं टिकली तरच शिव्या टिकतील ना…

अंगणात दोन कोंबडे शांतपणे किडे-मकोडे टिपत असतील तर दोघांच्या मधे तांदळाच्या कण्या टाकायच्या आणि आपण निवांत पणे त्या दोघांमधलं कण्यांसाठीचं भांडण पहात रहायचं हे दृष्य कोकणात (आणि इतर अनेक भागात) कॉमन आहे. कोकणाचा संदर्भ देण्याचं कारण एवढंच की तिथे एकमेकांचं भांडण लावून देणे या क्रियेला ‘कण्या घालणं’ असंच म्हणतात.

कोंबडे, बकरे, बैल अशा अनेक प्राण्यांमधे झुंजी लावायच्या आणि त्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा ही आपली (मानवजातीची) परंपरा आहे. परंपरा म्हटल्यावर आठवलं…जळ्ळीकट्टू या परंपरागत सणात आतापर्यंत किती बैल मेले असतील माहीत नाही पण त्यावर कोर्टाने बंदी घातल्याच्या निषेधार्थ झालेल्या निदर्शनांमधे मात्र काही माणसं नक्कीच मेली…. बैलांची झुंज लावणं हा आपला मूलभूत हक्क आहे हे दाखवणं ही खरी जिद्द! असो.

जोपर्यंत राजकारण चालणार आहे तोपर्यंत मतभेद पण चालणार/वाढणार आहेत. माणसांना माणसांविरुद्ध झुंजवलं जाणार आहे आणि जोपर्यंत आपण त्यांची ही नौटंकी देहभान हरपून पहाणार आहोत (सहन करणार) तोपर्यंत त्यांची चलती रहाणारच आहे.

ही अस्तित्वाची लढाई आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी मग भांडणं आलीच. आणि शिवीगाळ केल्याशिवाय भांडणात मजा ती कसली ???

डॉक्टर करंबेळकर राजेंद्र पु.
निगडी, पुणे.
(समाप्त)

AAP…..Will the Aam Admi Party be the next decades ruling party in India

The Indian National Congress has lost steam, is wavering, does not know how to rebuild confidence in the citizens it once enjoyed. The leadership is lost, has lost its goals. Looks like there might be no early comeback to its golden era. Priyanka Gandhi could make a difference, but looks like she is hesitant to lead. The INC is lost for the present. Gone are their great statesmen….no more Gandhi,Nehru, Shastri, Patel or Indira.

Regional parties and coalitions have their say in some states , the Trinamool in Bengal, JD and RJD in Bihar, TRS in Telangana etc….the Shivsena break away group in Maharashtra, Sharad Pawars Rashtravadi congress. The communists still have their sway in Kerala….none of these parties have the capability or charisma to win seats beyond their States. Many of their leaders are not even known to the Indian citizens. All are small fish in localized water collections, forget the sea , they do not even command power over rivers.

The present ruling party BJP is still riding on the Modi factor and glamor. True, some of their decisions have been welcome and good. Yet the rising inflation, sale of public companies, blatant privatization’s, anti minority decisions , unwillingness of the Prime minister to face the press and anti incumbency will catch up with them some day. Their use or misuse of the CBI, IT, ED etc to suppress their opponent’s, political parties and criticizers are surely not helping their cause. Today they have a brute majority at the center, most of the major states are now ruled by them. Their urge to be in power in all states has led them to poach opponent legislators, break parties, bringing about fall of elected governments. Money is being used blatantly , so are pressure tactics…all is fair in love war and politics.

There seems to be no single party today in India that can stand upto them, except the AAP. The rest of the parties to not any chance. The AAP came into limelight when it repeatedly won the state of Delhi. They didn’t just win swept the polls. It wasn’t lady luck, their excellent governance derided by many , out of jealousy was too good to be ignored. They swept the polls again. Slowly but surely Arvind Kejriwal grew in stature , he had become a force to reckon with. Every party including the BJP are after his blood, criticizing him, lambasting him for no reason, trolling him, spreading false news, trying to buy out his legislators , but of no avail. The truth cannot be hidden for long.

AAP forayed into other states with limited success, yes they did win seats, they have made inroads. Their candidates were new, common men, poor and rich , highly educated and the not so educated, they had found the right mixture of candidates, they didn’t play the religious or caste cards…they played the common man card, your next door neighbour could be a legislator now or may be yourself too.

Recently the swept the Punjab state polls. Doctors , engineers, mobile repair technicians were put up as candidates and won. The national parties bit dust, so the the regional Ajali Dal…..the Indian voter had matured….the results proved it.

Soon a few more states go to polls in the coming months. Gujarat , it seems looks like a win gir the AAP. You never know until the results are out. Their show in Goa was not good but they did manage to get seats, that’s not bad. Himachal too ,they might open their score, can’t predict how many. Why is this so….the normal Indian perhaps sees a ray of hope in this party….their success stories in Delhi especially where their administration has been good, their medical facilities.. The mohalla clinics….their education thrust has been liked by all. Well the IT cells of all parties have run them down, trolled them, but the truth is they have been a runaway success, you just can’t deny it….corruption at its least….no wonder all parties hate them. As for Arvind Kejriwal , he and his team have slogged a lot……success can’t elude them.

My views perhaps might not be agreeable to all, but its my view, I might be wrong but surely not way of target…..the future is AAP.

शिवीगाळ एक चिंतन (भाग सात)शिवीगाळ: विविध गुणदर्शन……….Dr Rajendra Karambelkar…. Part 7

एखाद्या वादात खरी बाजू कोणाचीही असो. कुणीतरी शिवी घालण्याचं निमि त्त….संपूर्ण भांडणालाच एक नाट्यमय कलाटणी मिळते. मुला-मुलांमधे कोणाचा कोणाला धक्का लागून (मग तो मुद्दाम असेल किंवा चुकून) पडल्याच्या भांडणाचा शेवट मात्र कोण कुणाला गाढव का म्हणाला? (किंवा….मी म्हटलंच नाही !) यातच होतो.

(नवरा बायकोच्या भांडणात बहुतेक वेळा विषयाला कलाटणी, कुणीतरी माघार घेईपर्यंत सहजच शिवीगाळ न करताही मिळत जाते त्यामुळे शिव्यांची फारशी गरज नसते. किंबहुना काहीवेळा तर कुणाचा तरी अबोला सुद्धा शिवी घालण्यापेक्षा जास्त अपमानास्पद वाटतो….)

भांडण आणि शिवीगाळ यांचं नातं जणू जिवा-शिवाचं (? जिवा-शिव्यांचं) नातं. खरंतर दोन्हीही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. शिव्यांचा वापर मूलतः आपला राग व्यक्त करण्यासाठी केला जातो हे सर्वज्ञात आहे. पण म्हणून चवताळून शिव्या घालणाऱ्याचीच बाजू खरी असेल असं मात्र गृहीत धरता येत नाही.

हे खरं आहे की शिव्यांचा वापर मुख्यतः भांडणाचा ‘दर्जा’ वाढविण्यासाठी होतो आणि होत राहील. पण “आयला” किंवा “आयला रे” हा शब्द आनंद-हर्ष, राग, आश्चर्य,  दुःख, करुणा अशा अनेक भावना व्यक्त करण्यासाठी खूप मदत करतो. वेळ मिळेल तेव्हा एकदा नाटकाच्या तालीम करतो आहोत असं समजून आयला हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे उच्चारून बघा. मजा येईल.

भांडणातला शिव्यांचा रोल सोडून द्या. खरी गंमत ही आहे की शिव्या मनोरंजनाचं काम पण समर्थपणे करू शकतात. मध्यंतरी ‘हरामखोर’ या अपशब्दाच्या वापरावरून महाराष्ट्रातील जनतेचं काही दिवस खूप छान मनोरंजन झाल्याचं तुम्हा सर्वांना आठवतच असेल.

कोकणात होळीच्या आसपास रोंबट केलं जातं. त्यात ढोल ताशाच्या बरोबर प्रौढ (शक्यतो दारू पिऊन) आणि मुलं (प्यायचा चान्स मिळतोय का याचा विचार करत) बेधुंद नाचत असतात. ते करताना शिव्या घालत घालत नाचणे हा त्याचा आवश्यक भाग असतोच पण ढोलाच्या तालात जी गाणी म्हटली जातात त्यातही बरेच अपशब्द असतात. त्यातलंच एक थोडंसं सोज्वळ गाणं आठवतंय…

होळी रे होळी
पुरणाची पोळी
सायबाच्या ××त
बंदुकीचा गोळी…

कदाचित असेच काही सांस्कृतिक कार्यक्रम इतरही भागात होत असतील. पण कोकणात जिथे लोक उठता बसता शिव्या तिन्हीत्रिकाळ घालत असतात तिथे होळीनिमित्त शिव्या घालण्यात फारसं अप्रूप नाहीये.

शिव्यांचा/अपशब्दांचा वापर अतिशय कलात्मकपणे लोककला आणि नाटक- सिनेमात सुद्धा केलेला आपण सर्वांनीच पाहिला असेल. विशेषतः दादांचे सिनेमातले काही (द्व्यर्थी) संवाद तर आजही लोकप्रिय आहेत. त्यांची ‘मायला’ म्हणण्याची स्टाईल (मराठीत त्याला लकब म्हणतात) तर आजही लोकप्रिय आहे.

लोककलेवरून लहानपणी ऐकलेली एक गमतीदार गोष्ट आठवली. एका गावात तालुक्याचे मामलेदार (जे फारसे लोकप्रिय नसावे ) भेट द्यायला आले होते. त्यांच्या स्वागत समारंभात गावातला एक इरसाल नमुना उभा राहिला आणि त्याने शाहिराच्या आवेशात गायला सुरुवात केली…

अहो…मामलेदार साहेब…
अहो…मामलेदार साहेब…
तुमच्या मायची..मी…
तुमच्या मायची.. मी…

तुणतुणं वाल्याने मस्त ठेका धरला होता आणि बराच वेळ हा पठ्ठ्या फक्त  “तुमच्या मायची मी…” एवढंच आळवत बसला. त्याच्या ‘मायची मी’ म्हणण्याच्या शैलीवरून प्रेक्षक हळूहळू खुदूखुदू हसायला लागले. इकडे मामलेदार साहेबांंचा पारा हळूहळू वर चढायला लागला. शेवटी ज्यावेळी त्याने आपली गाडी कुठे …तुमच्या मायची मी वरून –

करीन…चाकरी…खाईन… भाकरी…
करीन…चाकरी…खाईन… भाकरी…
वर वळवली तेव्हा कुठे मामलेदार जाग्यावर आले !

आपण सर्वांनीच पाहिलं असेल की जवळपास प्रत्येक वेळेस भर रस्त्यावर जेव्हा भांडण चालू होतं तेव्हा एक एक करून बघ्याची संख्या वाढत जातेच. जमावातील मध्यवर्ती प्रेक्षक भांडणाचं कारण समजून घेऊन त्यावर न्यायाधीशाची भूमिका सांभाळत असतात. तर काहीजण ‘हात साफ करायचा चान्स मिळाला तर करून घेता येईल’ म्हणून वाट पहात असतात. थोडे बाह्यांगाने उभे, अतिशय आत्मियतेने भांडणाचा रसास्वाद घेत असतात तर नवीन दाखल होणारे आपण काहीतरी अतिशय सुुरस आणि रंजक घटना पहाण्या पासून वंचित तर नाही ना झालो या आशंकेने..”काय झालं ? काय झालं ?” अशी विचारणा करत घोळक्यात सामील होत असतात. बघ्यांचा उत्साह जणू एखाद्या क्रिकेटच्या लाईव्ह मॅचच्या शेवटच्या ओव्हर सारखा…एकदा का हाणामारीला सुरुवात झाली की मग मात्र मॅच संपल्यावर पांगापांग होते तशी. हो, नाहीतर उगाचच एखाद्याचा गुद्दा आपल्यावर शेकायचा.

एकंदरीतच अशा भांडणांना जे सार्वजनिक मनोरंजनाचं स्वरूप प्राप्त होतं त्यावरून भांडणांनाही एक लोककला म्हणून मान्यता मिळायला हरकत नाही. त्याचबरोबर शिव्यांना एक लोकप्रिय साहित्यप्रकार म्हणून  शासनाने मान्यता दिली तर या कलेचा (आणि पर्यायाने) भाषेचापण अजून विकास होईल. विषेश करुन नवीन पिढीतील मुलांच्या मातृभाषेचा विकास होऊन त्यांचा दैनंदिन जीवनात मातृभाषेचा वापर पण खचितच वाढेल.

गल्ली पासून दिल्ली पर्यंत ही भांडण-संस्कृती फार हिरिरीने टिकवण्यात तमाम जनता उत्साहाने सहभागी झालेली पहायला मिळते. टीव्हीवरच्या रोजच्या वादविवादांचंच पहा ना ?  सगळे तज्ञ मुद्द्यावरून गुद्द्यावर यायला बसल्यासारखेच बोलत असतात आणि जनता डोळे फाडून फाडून (आणि कान फुटेपर्यंत आवाजात) त्यात तल्लीन झालेले असतात. आणि याला ‘प्राईम टाईम’ मनोरंजन म्हटलं जातं हे विशेष. एकंदरीतच गल्ली पासून दिल्ली पर्यंत कोणत्याही घटनेवर/घडामोडींवर वाद हा व्हायलाच हवा ही भावना तीव्र पणे दिसून येते. काही काही वेळा तर असं वाटतं की भांडणाच्या विविध स्तरांवर स्पर्धा जर सरकारने आयोजित केल्या तर क्रिडास्पर्धांपेक्षा त्यामधून जास्त उत्पन्न मिळेल. शिवाय भांडणं रंजक करण्यासाठी नवनवीन शिव्यांची निर्मिती होईल.

डॉक्टर करंबेळकर राजेंद्र पु.
निगडी, पुणे.
(क्रमशः)

शिवीगाळ एक चिंतन. (भाग सहा)शिव्या आणि नाती-गोती* Dr Rajendra Karambelkar….part 6

पुढे लिहिलेल्या घटनांमधे समान गोष्ट कोणती ?

एक: चौकात ट्रॅफिक सिग्नल लाल आहे. तुम्ही इमानदारीत तुमची गाडी बंद करून थांबलाय आणि शेजारून एक दुचाकीवाला हळूच तुमच्या गाडीच्या साईड मिररचा मुका घेऊन पुढे जातो.
दोन: कुठल्या तरी तिकीट काढायच्या रांगेत तुम्ही बराच वेळ ताटकळत उभे आहात आणि खिडकी उघडताच रांगेत उभा नसलेला कुणीतरी सोम्यागोम्या डायरेक्ट खिडकीला भिडतो आणि तिकीट काढायचा प्रयत्न करतो.
तीन: सकाळी सकाळीच तुमच्या घरच्या गेट समोर प्रभातफेरीला आलेला कुत्रा शी करतोय आणि आपल्या कुत्र्याला  घेऊन आलेला मालक त्याचा पट्टा पकडुन मोठ्या सबुरीने त्याच्या शीचा कार्यक्रम पूर्ण व्हायची वाट बघतोय.

तुम्ही नक्कीच गोंधळला असाल की या तीनही घटनांमधे कोणती समानता आहे ?

उत्तर आहे…दुचाकीस्वार, सोम्यागोम्या आणि कुत्र्याच्या मालक या तिघांच्याही आईची चूक. अजून नाही समजलं ?

वरची तीन उदाहरणंच नाहीत तर वादाच्या जवळपास सर्व गोष्टींमधे/घटनांमधे दुसर्‍याच्या आईला भांडणात खेचलं जातंच. का ? अशा नमुन्यांना तिने जन्म दिला म्हणून ? बिच्चारी आई.

मला वाटतं बहुतांश भांडणांमधे “तुझ्यायला तुझ्या” हीच नांदी असते आणि नाटकातले पुढचे संवाद हे पूर्णपणे spontaneous असतात. हे असं का ? याचा फार गांभीर्यपूर्वक (?) विचार केल्यावर मला एक महत्वपूर्ण शोध लागला तो असा की एखाद्याच्या प्रिय व्यक्तीचा त्याच्यासमोर अपमान केला तर त्याचा परिणाम हा त्या व्यक्तीच्या अपमानापेक्षा जास्त होतो (हा नियम लवकरच मी मानस शास्त्रात माझ्या नावावर खपवणार आहे). शिव्या आणि आई किंवा आपली इतर नाती यांचं त्यामुळेच विषेश नातं आहे.

बर्‍याचशा प्रचलित आणि लोकप्रिय (?) शिव्या या आई या दैवतावर आधारित आहेत. अर्थात त्या शिव्यांचा इथे जाहीर पणे उल्लेख करणे अनुचित तर आहेच पण त्या शिव्यांचा सार्वजनिक वापरसुद्धा निंदनीय किंवा अंगावर शिसारी आणणारा एक किळसवाणा प्रकार वाटतो. पण चिंतनाचा एक भाग म्हणून असं वाटतं की आईवरून घातलेल्या अशा घ्रृणास्पद शिव्या ऐकून कोणाच्याही अंगाचा तिळपापड होईल आणि म्हणूनच की काय, प्रतिस्पर्ध्याचे रक्त सहजच उकळून काढण्यासाठी हा एक अतिशय सोपा उपाय आहे. जर उद्या कोणी शिव्यांचा प्रभावीपणा मोजण्यासाठी एखादी पद्धती (scale) शोधली (असा महाभाग नक्की पैदा होणार) तर या आईवरून घातलेल्या शिव्यांचा प्रभाव (impact factor) इतर शिव्यांपेक्षा खूपच जास्त सापडेल.

लहानपणी मला जे आई वर आधारित शब्द अपशब्द वाटायचे (आणि घरी त्यांच्या उल्लेखावर पूर्ण बंदी होती) ते सारे (त्या वेळचे अप-) शब्द आता मात्र बर्‍यापैकी ‘नॉर्मल’ समजले जातात. त्यात काही काही शब्द वेगवेगळ्या भागात प्रकर्षाने बोलले जातात असही वाटतं. उदा. ‘आवशीक खाओ कोलो’ / आवशीचो घो (कोकण), मायला (पश्चिम महाराष्ट्रात), च्यायला (पुणे), आयला (मुंबई). नवीन पिढीत ‘आईच्ची जय’, ‘आईच्च्या गावाला’ (आईग्ग…खूप जुना) किंवा फक्त ‘आईच्ची’ हेही वापरलेले दिसतात.
‘तुझ्यायला’ हा मैत्री दर्शक असला तरी ‘तुझ्यायला तुझ्या’ हा मात्र बहुतेक वेळेस ज्वलनशील असतो.

‘आयला’ ह्या शब्दाचं आणखीन एक कौतुक आहे. हा शब्द वेगवेगळी रसोत्पत्ती सहजच निर्माण करतो पण त्याच बरोबर मराठीतून हिंदीत गेलेल्या काही शब्दांमधे हा शब्द आजकाल स्वच्छपणे ‘नॉर्मल टपोरी’ शब्द म्हणूनही वापरला जातो.
“आयला रे लडकी मस्त मस्त तू आयला रे….
फिर से बोल जरा तू जो बोला रे…” हे गाणं त्याचंच उदाहरण आहे.

आईच्या नंतरचं प्रेमळ नातं म्हणजे बहिणीचं नातं. बहिण-वाचक शिव्यांच्या एकंदरीत (जास्त) वापरावरून असं दिसतं की बहिणीवरच्या प्रेमाच्या बाबतीत पंजाबी लोक आपल्या खूप पुढे आहेत.

पण आई-बहिणी वरच्या शिव्यांची लोकप्रियता पाहून हे ही सिद्ध होतं की आपण फारा-पूर्वीपासून आपल्या माता भगिनींचा किती आदर करत आलो आहोत आणि ही नाती आपल्या हृदयाच्या किती जवळची आहेत. विषय मराठी भाषेचा आहे, पण मला माहीत असलेल्या इतर भाषांचा जर मी विचार केला तर एक गंमत सगळ्याच भाषांमधे समानतेने मला आढळली  आणि ती म्हणजे आई-माई वर आधारित शिव्या सर्व भाषांमधे आहेत !

इतर नात्यांवरचं आपलं प्रेम किती आहे हे त्या त्या नात्यांवर आधारित शिव्या किती आहेत यावरून स्पष्ट होतं. “The number of Abusive words present in the language are directly proportional to the intensity of love with that relationship in the culture using that language” असाही एक सिद्धांत (?) माझ्या नावावर प्रकाशित होणार आहे. (हे मुद्दाम इंग्रजीत लिहिलंय.  कारण एखादी अत्यंत फालतू गोष्ट सुद्धा इंग्रजीत लिहिली की तिचं ‘वजन’ वाढतं आणि लोकांना ती पटवायला सोपं जातं. असो.)

बाप, आजा (आजोबा), आजी यांचा उद्धार त्यामानाने कमी वेळा ऐकायला मिळतो. चुकून कधीतरीच काकाचा (काकोबा) उद्धार होतो. काकू, मामा ही नाती/शब्द तर काहीवेळा अपशब्द म्हणूनसुद्धा वापरले जातात. आत्या, मामीचा वापर क्वचितच.
अगदी खानदानाच्या 56 पिढ्या सुद्धा निघतात पण भावावरून शिवी कुणी ऐकलीय? मी तरी आज तागायत ऐकल्याचं आठवत नाही. पण यावरून भाऊ या नात्यात अजिबात दम नाही हे स्पष्ट होतं असंच मला वाटतं.

या सर्व नात्यांवरील  शिव्यांचा विस्तृत उल्लेख (जंत्री सारखा)  करायचं म्हटलं तर एक छोटा शब्दकोश नक्कीच तयार होईल. पण या शिव्यांची जंत्री लिहिणे हा  या चिंतनाचा भाग नसल्यामुळे ज्या ज्या इच्छुकांना या शिव्यांची प्रतिक्षा होती त्यांनी कृपया आपली उजळणी आपल्या आपणच करावी.

* नाती-गोती हा शब्द लिहिताना उगाचच असं वाटलं कि जी नाती आपल्याला गोत्यात आणतात त्या नात्यांना ‘गोती’ म्हणायचं असतं का ?

डॉक्टर करंबेळकर राजेंद्र पु.
निगडी, पुणे.
(क्रमशः)

शिवीगाळ आणि मानसिक स्वास्थ्य Dr Rajendra Karambelkar… Part 5………..

शिवीगाळ एक चिंतन (भाग पाच)

शिवीगाळ आणि मानसिक स्वास्थ्य

एका गावात एक साधू बाबा रहात होते. एकदम सत्पुरुष. चांगले विचार, सात्विक भाव, चांगलं बोलणं इ.इ… बाबा म्हणण्यासाठी आवश्यक ते सर्व गुण त्यांच्यात होते. एकदा आश्रमात सजावट करायची होती म्हणून त्यासाठी भिंतींवर खिळे ठोकायचे होते. आश्रमातल्या सेवेकर्‍या ऐवजी बाबा स्वतःच कामाला लागले. बाबांचं खिळे ठोकण्याचं काम चालू होतं तिथे एक छोटा मुलगा त्यांचं काम नीट निरखून पहात होता. बाबांनी कौतुकाने विचारलं “बाळ, श्रमाचं महत्त्व समजून घेतोयस का ?” मुलाने थोडसं गोंधळून जावून उत्तर दिलं. ” नाही ? मला कुतूहल आहे की तुम्ही खिळा ठोकताना हातोडा चुकून तुमच्या अंगठ्यावर बसला तर तुम्ही कसं ओरडणार आहात आणि कोणत्या शिव्या घालणार आहात !”. अनपेक्षित उत्तराने बाबा चपापले. हातोडा अंगठ्यावर बसला…आणि क्षणार्धात वातावरण “आई…गं….×××, #@ ###, ×××××, ××××….” ने भरुन गेलं.

ज्या ज्या लोकांनी खिळे ठोकताना हातोड्याने आपल्या अंगठा ठेचला आहे ते सर्व जण माझ्या या विधानाशी सहमत होतील की ही घटना एक ‘शिवी-इमर्जंसी’ असते. मेडिकल इमर्जंसी सारखी. कणभर जास्तच अर्जंट. हातोड्याने अंगठा किंवा बोट ठेचलं गेलं की क्षणाचाही विलंब न करता किंचाळून शिव्या हासडणं केवळ अपरिहार्य असतं. पहिल्यांदा खिळा (साला, त्याचं डोकं किती लहान आहे/वाकला साला) मग हातोडा (साला, सटकला हातातून) मग आपलं नशीब (×××, कसा तो नेम चुकला इ.) आणि झालंच तर भिंतींवरचं प्लास्टर करणारा गवंडी (च्यायला त्याच्या, घराचं प्लास्टर केलंय का किल्ल्याचं?)…आळीपाळीने या सर्वांना साधारणपणे पाच एक मिनिटं शिव्या घातल्यावरच वेदना कमी होते.
दरवाज्यात बोट चेमटणं, पायाच्या अंगठ्याला ठेच लागणं (विषेतः त्याचं नख वाढवल्यावर), मोटारसायकलला किका (kicks) घालताना किक उलटी फिरून पायाच्या नडगीवर (shin of tibia) आपटणे…अशा अनेक घटना सांगता येतील की जिथे शिव्या ह्या ‘वेदनाशामक’ तर असतातच पण आपलाच हलगर्जीपणा स्वीकारायला मदतही करतात.

असा एक बाळबोध विचार जरूर ऐकायला मिळतो की अशी कोणतीच गोष्ट नाही किंवा काम नाही जे शिव्या न घालता करताच येत नाही. मान्य आहे. पण मी म्हणतो की शिव्या घालून काम केलं तर काय फरक पडतो ? ज्याची त्याची शैली ! काम पण झालं पाहिजे आणि मनाला पण बरं वाटलं पाहिजे ना ? खरं सांगा, एखाद्याला पोटतिडकीने शिवी घातल्यावर जे काही मानसिक समाधान मिळतं ते खरंंच अतुलनीय असतं की नाही ?

जेवढं एखाद्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं तेव्हढंच समाजाचं सामाजिक स्वास्थ्य पण महत्त्वाचं.
सोसायटीच्या मिटिंग मधे अनुपस्थित सभासदांना सर्व संमतीने सामुदायिक पणे शिव्या घातल्यावर भले सोसायटीचा कोणताही प्रश्न सुटत नसेल पण उपस्थित सर्वांना ‘बरं वाटतं’ हे नक्की. राजकीय सभांमधून पण आपल्या विरोधी पक्षाला आणि विषेशतः त्यांच्या नेत्यांना शेलक्या शिव्या घातल्यावर वक्ते आणि श्रोते दोघेही खुश होतात. एकंदरीतच, नुसत्या शिव्या घालून कोणत्याही समस्येचा हल झाला नाही तरी आपण निर्भीडपणे आपली भडास सार्वजनिक रित्या काढली ह्यात सर्व जनता समाधानी असते.

सुदृढ समाजासाठी आणखीन एक गोष्ट पण महत्त्वाची आहे. एकमेकांबरोबर ॠणानुबंध जोडणं, नवीन नाती निर्माण करणं आणि ती टिकवणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आता नवीन नाती जोडायची तर मनं जुळायला हवीत. थोडीफार का होईना मतं पण जुळायला हवीत. हे साध्य करायला चांगलं बोलणं जसं मदत करतं तसं मद्यपान पण मदत करतं. एकमेकांमधील फरक नाहीसे करायला मद्य हे जर रसायन मानलं तर शिवीगाळ करणं त्याच्याबरोबर एका catalystची भूमिका पार पाडत असतं. आता हेच पहा. तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्ती कडून काम करून घ्यायचंय. धरून चालू की ती पंजाबी आहे. तुम्ही त्याच्या बरोबर बोलताना साधारण पणे प्रत्येक वाक्यात दोन ते तीन वेळा भेनजींची आठवण काढली तर तुमचं काम तर झालंच समजा. तो तुमचा मित्र पण होईल. मग त्याला दारू पाजा आणि बेहेनजीच्या नावाचा जप करत करत त्याच्या चौथ्या पेग नंतर (त्यापेक्षा कमी पिणं हे पंजाबी माणसासाठी कमीपणाचं/कमीपिण्याचं लक्षण आहे) जर तुम्ही त्याचा पाचवा पेग भरला तर तो तुमच्यासाठी जीव द्यायला पण तयार होईल. दारू विदेशी असेल आणि तुम्हीच बिल भरणार असाल तर सहाव्या पेग नंतर तो याच जन्मी काय पुढच्या जन्मात पण तुमच्यासाठी मरायला तयार होईल. पण हे सगळं फक्त दारू मुळे होत नाही तर शब्दा-शब्दागणिक केलेल्या शिव्यांच्या पेरणीमुळे सुद्धा.

शिवीगाळ ही वाईटच असते असं समजणार्‍या अज्ञ लोकांना शिवीगाळ ही एक प्रकारे, आजकाल ज्याला Icebreaker म्हणतात, तसं काम करून एक सशक्त समाज निर्माण करायला मदत करते हे कसं कळणार ?

‘मन मोकळं करणं’ हे मानसिक आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे या सत्याचा विचार केला तर (अगदी) मनापासून शिवीगाळ करणे हे मानसिक आरोग्यास नक्कीच उपयुक्त आहे असं मानता येईल.

मनातल्यामनात कुढणाऱ्या व्यक्तींचे/रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी त्यांना शिवीगाळ करायला प्रोत्साहन देण्याच्या उपचार पद्धतीचे (अपशब्द चिकित्सा) अवलंबन करण्याची पद्धत पण विकसित व्हायला हवी. (आजकाल समलिंगी व्यक्ती coming out करतात आणि त्यांचं मानसिक दडपण दूर होतं तसं यांनीही सार्वजनिकरीत्या शिव्या घालायला सुरुवात केली तर त्यांचही outcome चांगलंच होईल.)
बरं. या पद्धतीचं प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरची गरज पडणार नाही. पेशंटला शिकायला अवघड नाही. सहज वापरता येईल… आणि मुख्य म्हणजे शक्यतो प्रतिस्पर्ध्याने बत्तिशी घशात घातली नाही तर याला खर्च पण येणार नाही ! या चिकित्सेमुळे काही दुष्परिणाम (side effects) होऊ शकतील हे खरं आहे परंतू “If there are No Side Effects then there is even less chance for Good Effects” या न्यायानुसार त्या दुष्परिणामांकडे कानाडोळा करता येईल असं मला वाटतं.

शिव्या घातल्यामुळे जसं शिव्या घालणाऱ्याचं मानसिक स्वास्थ्य सुधारू शकतं तसं दुसर्‍यांनी घातलेल्या शिव्या खाऊन (किंवा त्यांनी केलेली निंदा स्वीकारून) शिव्या खाणाऱ्या व्यक्तीचा विकास करायला किंवा त्याला एक दिशा आणि मार्गदर्शनही मिळू शकतं.(निंदकाचे घर असावे शेजारी). सारांश, शिव्या किंवा निंदा ही चिकित्सा काहीवेळा द्विपक्षीय मानसिक आरोग्यास सुद्धा पूरक ठरू शकते. अशा प्रकारे एकमेकांच्या आई-बापाचा उद्धार हा समजोद्धारास सुद्धा हातभार लावू शकतो.

Laughter Club च्या धर्तीवर जर ‘शिवीगाळ मेळे’ आयोजित केले तर लोकांची मनं जास्त मोकळी होतील असं मला वाटतं.

डॉक्टर करंबेळकर राजेंद्र पु.
निगडी, पुणे.
(क्रमशः)

Dr Rajendra Karambelkar ………………..Part 4………शिवीगाळ एक चिंतन (भाग चार)शिवीगाळ: एक अवलोकनआदिमानव एकमेकांशी कसा भांडत असेल ? मूकपटातल्या पात्रांसारखा?! कारण भाषाच नव्हती ना.

कालांतराने समाज व्यवस्थेत जेव्हा तो रहायला लागला असेल तेव्हा नक्कीच आपापसात वादावादीला (लफड्यांना) सुरुवात झाली असेल…आणि थोड्या थोड्या भाषेची पण सुरुवात झाली असेल. अशावेळी शिव्यांचा जन्म होणं ही काळाची गरज होती.
असं म्हणता येईल की शिव्यांचा जन्म भाषेच्या अगदी सुरुवातीचा आणि बाकी भाषेचा सर्वांगीण विकास थोडा उशिरानेच झाला असावा. त्यामुळे ढोबळ मानाने शिव्यांचे वर्गीकरण प्राच्य आणि अर्वाच्य (!!!)  असं करता येईल. पण आजकाल सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर जशा चित्र-लिपीत लिहिलेल्या शिव्या सर्रास दिसतात तसं काही आदिमानव रहायचा त्या गुहांमधल्या चित्रांमधे आढळत नाही.

आपल्या पौराणिक कथांंमधे आपले ऋषिमुनी आणि देव यांना राग आला (त्या काळात रागाला क्रोध किंवा कोप असंच म्हणायची फॅशन होती. असो. ) की  दुसर्‍याला ते अपशब्दांबरोबर एखादा शाप पण द्यायचे.म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर त्या काळात ‘शाप’ हे शिव्यांबरोबर कॉंप्लिमेंटरी असायचे. एकावर एक फ्री ! ” तू पुढच्या जन्मी श्वान होशील” वगैरे. त्यामुळे त्या काळात शिवीगाळ या शब्दाऐवजी ‘शिव्याशाप’ हा शब्द प्रचलित होता. (आमच्या लहानपणी गावात कुणी दाढीवाला फकीर दिसला की आम्ही घाबरून दूर पळून जायचो. काय सांगावं उगाच त्याला राग आला तर फुकट आपलं कुत्र्याचं पिल्लू करून टाकायचा). पण आजकाल आपले बहुतांश दाढीवाले अगदी रांग लावल्या सारखे तुरुंगात जाताना दिसतायत. शिवाय शापांची थोडीफार शिल्लक राहिलेली भिती अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांनी घालवली. त्यामुळे आता फक्त शिवीगाळ शिल्लक आहे शिव्याशाप नाही. नाही म्हणायला शाप हा शब्द जरूर ऐकायला मिळतो तो रास्त धान्य दुकानात, जिथे साखर नेहमीच ‘शाप’ संपलेली असते.

एखाद्याची निर्भत्सना करायला त्या काळात सुसंस्कृत अपशब्द (म्हणजे संस्कृत मधून आलेले म्हणून ! ) वापरले जात. त्या काळात वापरले जाणारे नराधम, क्रूर, अधर्म्या, लंपट, चांडाळ, निर्दयी, पाषाण हृदयी, अधमा, अमानवी असे अनेक शब्द आजकाल ऐकायला तर सोडाच वाचायला देखील मिळत नाहीत. नवीन पिढीतील मुलांना जिथे ‘कडेवर वळ’ म्हटलं तर तोंडाकडे पहात बसतात आणि ‘ एका साईडला टर्न हो’ म्हटलं तरच वळतात त्यांना हे शब्द अपशब्द आहेत हे सांगून देखील कळणार नाही…किंबहुना त्यांना ‘अपशब्द’ हाही शब्द कळणार नाही.
माझी आजी जबरदस्त धार्मिक होती. सतत पौराणिक कथा वाचायची आणि रेडिओ वरची कीर्तनं पण ऐकायची. त्यामुळे आजोळी गेलं की तिच्या तोंडी कधीतरी ‘शुंभ, षंढ, मूर्ख’ असे वेगळे शब्द ऐकायला मिळायचे. आजकाल तेही क्वचितच ऐकायला मिळतात. तशी ती कधीतरी ‘लंबकर्णा’ हा पण शब्द वापरायची. (गाढवाला राग येवू नये म्हणून).

संत वाङ्मयाचा विचार केला तर तिथे शिव्यांना अजिबात थारा नाहीये असं वाटतं. आपल्या वैयक्तिक जीवनात काहीवेळा दुसर्‍यांनी केलेली आपली  निंदा मात्र आपल्या ‘सुधरण्यासाठी’ किती आवश्यक आहे हे सांगण्यासाठी  जगद्गुरूंनी लिहून ठेवलंय की “निंदकाचे घर असावे शेजारी.”
म्हणजे शेजाऱ्याने केलेली निंदानालस्ती आपण किती हसत खेळत स्वीकारायला हवी ही त्यांनी दिलेली शिकवण (महत्त्वाची) आहे. त्यामुळे आपला शेजारी आपला निंदक असणे अतिशय आवश्यक आहे. आपले संबंध आपल्या शेजाऱ्या बरोबर (किंवा विषेशतः शेजारणी बरोबर) जर प्रेमाचे असतील तर तुम्ही नक्की प्रॉब्लेम मधे आहात असं गृहीत धरायला काहीच हरकत नाही !

बरेचसे अपशब्द आजकाल क्वचितच ऐकायला मिळतात. (मी सदासर्वकाळ शिव्या घालतो किंवा शिव्या घालणाऱ्यांच्या संगतीत रहातो असा गैरसमज कृपया वाचकांनी करून घेऊ नये).
उदा. ‘अक्करमाशी’ ही शिवी ऐकल्याला खरंच जमाना झाला. त्याचा खरा अर्थ आजही माहीत नाही मला पण माझ्या बाबांचा तो आवडता शब्द होता. या शब्दाच्या आठवणी वरून मला आणखी एक शोध लागला तो म्हणजे प्रत्येकाची अशी एखादी शिवी ‘आवडती शिवी’ असते की जिचा वापर ती व्यक्ती सर्रास करत असते आणि काही शिव्या त्याच्या ठेवणीतल्या शिव्या असतात…विषेश प्रसंगी वापरायच्या. ठेवणीतल्या साडी सारख्या.

शिवीगाळ म्हटलं कि नात्यांवर आधारित शिव्या आणि शारीरिक अवयवांवर आधारित शिव्या ह्या प्रथम दर्जाच्या शिव्या…. इरसाल आणि अर्वाच्य. (त्या विषयावर पुढच्या लेखा मध्ये). पण अपशब्द म्हणून इतर अनेक गोष्टींचा सुयोग्य वापर वेळोवेळी केला जातो. अपशब्द म्हणून जशी प्राण्यांची मदत घेतली जाते तशी इतर अनेक गोष्टींची मदत होते. ‘हलक्या फुलक्या’ चिडवण्यासाठी बटाटा, रताळं, दोडकं, भोपळा, कुजकट बेदाणा अशा अनेक खाद्यपदार्थांचा उपयोग होतो. पक्षांमध्ये पोपट, कावळा, कोंबडी तर भांड्यांच्या श्रेणीत चमचा, माठ आणि रांजण लाडके असल्याचं दिसतं.

भाषेत बदल घडत जातोय तसा प्रचलित शिव्याही बदलत चाललेल्या दिसतात. प्रत्येक पिढीतल्या प्राधान्याने वापरल्या गेलेल्या शिव्यांवरून आणि त्यात होणाऱ्या बदलांवरून मानववंशशास्त्रज्ञ बरेच निष्कर्ष काढतात असं माझ्या वाचनात आलं तेव्हापासून शिवीगाळ या प्रकाराबद्दल माझा आदर खूपच वाढलाय !

आजकाल इतर भाषांचा प्रभावही आपल्यावर वाढत चाललाय. शिव्याही त्याला अपवाद नाहीत. ‘साला’ ही शिवी हिंदीतून (सिनेमातून) आली आणि आपलीच होवून गेली. तसं आपल्या भाषेत आपला पाय सालीवर घसरतो….पण ती केळ्याची साल.

‘बा×टर्ड’ ही शिवी नव्या पिढीची लाडकी. विषेशतः इंग्रजीतून शिकणाऱ्या मुलांची. पण जिथे तिथे तिच ती शिवी वापरताना त्यांना ऐकल्यावर मात्र आपली समृद्ध शिवी-विविधता आता कमी होत जाईल का काय अशी शंका उगाच मनात येते.

असो. काळाच्या ओघात जिथे मदरटंगच साईडला पडायला लागलीय तिथे शिव्या तरी काय टिकणार म्हणा ? आई-माई वरच्या शिव्या टिकल्या तरी खूप झालं.

डॉक्टर करंबेळकर राजेंद्र पु.
निगडी, पुणे.
(क्रमशः)

%d bloggers like this: