Watch “Mother’s love & Affection” on YouTube

बुलबुल ची रोजनिशी १९…………Dr Rajendra Karambelkar…Final part

बुलबुल ची रोजनिशी   १९

आमच्या कालच्या गडबडीवरून बिबुशेटला कळलं होतं की आम्ही घर रिकामं केलंय. सकाळी सकाळी आपल्या बायकोला घेऊन माझ्याकडे आला. त्यांना आमचं रिकामं घर वापरायला हवं होतं. आमच्यात आपलं घर आपण रिकामं केलं की दुसऱ्या कुटुंबाला वापरायला द्यायची पद्धत आहे (शिवाय त्यात बिबुशेटची बायको पण मला खूप आवडते) त्यामुळे त्यांना नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. 

घराचा ताबा देण्यासाठी आम्ही तिघेही मग आमच्या घरट्याकडे गेलो. कालच्या गडबडीत केळीच्या पानाला लावलेला टाका निसटून घरट्यावरचं पॅव्हेलियन थोडं सरकलं होतं पण बिबुशेटची बायको बिनधास्त आहे त्यामुळे तिने उगाचच त्याचा फारसा बाऊ केला नाही. 

घरट्याचा ताबा देऊन आम्ही निघणारच होतो तेव्हढ्यात  माझं लक्ष काकांच्या खिडकीकडे गेलं. काका आणि काकू दोघेही स्तब्ध होऊन आमचं रिकामं घरटं टक लावून पहात होते. काकूंचा रडवेला चेहरा पाहून त्यांना कशाचं तरी अनावर दुःख झाल्यासारखं दिसत होतं.

तेवढ्यात काकूंनी आमच्या रिकाम्या घरट्याकडे बोट दाखवलं आणि काकांना म्हणाल्या  Empty Nest Syndrome…..हे बोलल्यावर तर त्यांचा चेहरा अजूनच दुःखी झाला. 

हा सगळा प्रकार पाहून मी मात्र गोंधळात पडलो. बिबुशेटला खिडकीकडे चोच करून दाखवलं आणि म्हटलं की आपली पिल्लं घरट्यातून बाहेर पडलीत म्हणून आपण तर किती जाम खुश आहोत मग काका काकूंना का वाईट वाटतंय ?

बिबुशेट क्षणभर विचार करुन म्हणाला…..”अरे, त्यांना कदाचित त्यांचं पिल्लू त्यांच्या घरट्यातून उडून गेल्याच्या दिवसाची आठवण येत असेल बघ.”

त्याच्या या उत्तराने तर माझा गोंधळ अजूनच वाढला. मी म्हणालो की पिल्लू घरट्यातून उडून गेलं यात दुःख कसलं ? पिल्लाला त्यांनी सुद्धा मोठं केलं असेल ते सुद्धा मुळात घरट्यातून उडून जायलाच ना ?

बिबुशेट म्हणाला…”ते खरंय रे.  पण या माणसांना ना आपलं पिल्लू खूप मोठं व्हावं आणि त्याने सगळं जग जिंकावं असं जरी  वाटत असलं ना तरीही ते रहावं मात्र आपल्या घरट्यात आणि आपल्याच बरोबर असंही वाटत असतं बघ. पिल्लू घरट्याबाहेर गेलं तरीही परत परत त्याने आपल्या घरी येत रहावं असंच वाटत असतं त्यांना.”

मी: हे कसं शक्य आहे ?

बिबुशेट: हे बघ. तुला जे कळतंय ना ते त्यांनाही कळत असतं रे पण वळत नाही…..

आमचं संभाषण सुरू असताना काका आणि काकू अजूनही तिथेच खिडकीत उभे होते. नि:शब्द. 

बघता बघता काकांनी हळूच आपला हुंदका आवरला आणि पाणावलेल्या डोळ्यांनी काकूंकडे पाहिलं….. तोपर्यंत काकूंच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर लोटला होता……

आम्ही तिघेही तिथून उडून गेलो.

बुलबुल

दिनांक १७ एप्रिल २०२२.

समाप्त.

बुलबुल ची रोजनिशी १७ & १८..Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी   १७

आज दिवसभर पिल्लांची बडबड चालू होती. 

त्यांना घरट्यातून बाहेर बरंच काही दिसत होतं आणि त्या सर्व गोष्टींबद्दल त्यांना कुतूहल होतं.

चि… म्हणजे आमची ‘ही’ त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं देत होती. संभाषण खूप मजेदार होतं.

उदाहरणार्थ….

छोटं पिल्लू: आपल्या घराबाहेर हे सगळं हिरवगार काय आहे ?

चि: ती सगळी झाडं आहेत.

छोटं पिल्लू: ती कुणाची आहेत ?

चि: आपल्या सर्वांची. आपल्याला ती खाऊ देतात.

छोटं पिल्लू: (मान वर करून) ते निळं काय आहे ?

चि: आकाश.

छोटं पिल्लू: ते कशासाठी आहे ?

चि: आपल्याला उडण्यासाठी आहे.

छोटं पिल्लू: ते कोणाचं आहे ?

चि: ते पण आपल्या सगळ्यांंचं आहे.

छोटं पिल्लू: तुम्ही घरट्यातून सारखं सारखं कुठे जाता ?

चि: आम्ही तुमच्या साठी खाऊ आणायला जातो.

इतका वेळ शांत बसलेलं मोठं पिल्लू बोललं… “आम्हाला पण तुमच्या सारखं भुर्रकन घरट्यातून बाहेर उडत जायचंय. तू आम्हाला उडायला शिकवणार का आम्हाला त्यासाठी कुठच्या तरी शाळेत घालणार ?”

चि हसत हसत म्हणाली, बाळांनो तुम्हाला सगळं काही आपोआप जमेल. आणि हो…आपण काय खावं ? काय खावू नये? आपले मित्र कोण आणि शत्रू कोण? या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआपच समजत जातील. तुम्हाला त्या साठी शाळेत घालायला तुम्ही काय माणसांची पिल्लं थोडीच आहात ?

छोटं पिल्लू: माणूस कोण आहे ?

चि: तो दोन पायांवर चालणारा प्राणी आहे. तो जमिनीवर राहतो. पण लक्षात ठेवा. आपण त्यांच्या पासून दूर उंचावर आकाशात रहायचं.

छोटं पिल्लू: का ?

चि: कारण तो आपल्या बरोबर असं वागेल याचा काही नेम नाही…फारच बेभरवशी.

हे बोलणं चालू होतं तेवढ्यात तिला शेजारचे काका खिडकीत उभे दिसले. तिने पिल्लांना त्यांच्याकडे चोच करून दाखवलं आणि पिल्लांची बोलतीच बंद झाली !

आज दिवसभर दोन्ही पिल्लं आपल्या नाजूक पंखांचे सतत व्यायाम करत होती. सारखी धडपड सुरू होती घरट्याबाहेर काय आहे पहायची. एका पिल्लाने तर घरट्याच्या काठावर चढायचा प्रयत्न केला.घरट्याच्या बाहेर पडायची केवढी ती धडपड‌! बरं झालं मी शेजारीच बसलो होतो. लगेचच त्याच्यावर डोळे वटारून त्याला आत ढकललं.

पण एकंदरीतच दोघांचीही प्रगती खूपच चांगली आहे.

बुलबुल

१५ एप्रिल २०२२

लबुल ची रोजनिशी   १८

हुर्र~~~~रे~~~~!

शेवटी आज सकाळी सकाळी दोन्ही पिल्लांनी घरट्यातून साडे माडे तीन करत बाहेर धडाधड उड्या मारल्याच. 

नशीब इथे दाट झाडी आहे त्यामुळे दोन्ही पिल्लं खूप उंचावर राहिली. 

धड उडता येत नव्हतं ना तोल सावरता येत होता. पण आत्मविश्वास केवढा ? दोन तीन वेळा फांदीला नीट पकडता आलं नाही म्हणून थोडी गडबड नक्कीच झाली. पण मग थोड्या वेळाने एका फांदीवर तोल सावरून नीट बसता यायला लागलं.

आम्ही दोघेही पिल्लांना छोट्या छोट्या उड्या कशा मारायच्या किंवा पंख कसे फडफडवले तर उडता येईल याचं प्रात्यक्षिक दिवसभर करून दाखवत होतो. चुकून जर कोणी आम्हाला असं करताना पाहिलं असतं ना तर त्यांना नक्कीच हसू आलं असतं कारण आम्हाला पिल्लांसमोर पाठमोरं राहून ती हालचाल करून दाखवावी लागत होती !

पिल्लांना खाऊ घालत रहायचं, शिकवायचं, प्रोत्साहन द्यायचं आणि मुख्य म्हणजे बोक्यावर पण लक्ष ठेवायचं यात आजचा दिवस खूपच गडबडीत गेला. पण आपली पिल्लं मोठी झाल्याचा आनंद आणि समाधान काही वेगळंच आहे ! 

आजचा संपूर्ण दिवस काकांच्या घरचा परिसर फक्त आमच्याच आवाजाने भरून गेला होता. 

मजल दर मजल करत संध्याकाळपर्यंत पिल्लांनी शेजारच्या जाधवांचं आंब्याचं छोटं झाड गाठलं पण.

चला…. आता अजून दोन तीन दिवस पिल्लांची घरट्याबाहेर काळजी घेतली की आमचं काम संपेल असं वाटतंय.

बुलबुल

१६ एप्रिल २०२२.

बुलबुल ची रोजनिशी १५ & १६

बुलबुल ची रोजनिशी   १५

आमच्या घरट्याच्या अगदी जवळ काकांचं चिक्कूचं झाड आहे. चिक्कू मस्त साखरे सारखे गोड आहेत. मला त्यांचा गर पटापट आणून पिल्लांना भरवणं सोपं वाटत होतं‌ (आणि मधे मधे मला पण माझ्या आवडीचं गोड खायला मिळत होतं). पण हिच्या चाणाक्ष नजरेतून हे काही सुटलं नाही. माझ्यावर खेकसलीच.

म्हणाली — पिल्लांना उगाच एवढी गोडाची चटक लावू नका. नुसतीच जाडी ढोली होतील….आणि शिवाय  किडे मकोडे खायला नाही शिकली तर मग प्रोटीन्सचं काय ? 

हिचं आहारज्ञान बुलबुलीमंडळात जावून बरंच सुधारलंय. 

मी आपला गपगुमान किडे शोधायच्या नावाखाली काढता पंख घेतला. 

बुलबुल

१३ एप्रिल २०२२.

बुलबुल ची रोजनिशी   १६

पिल्लांना दिवसभर खायला घालण्यात आज एवढी दमछाक झालीय की रोजनिशी लिहायला काही त्राणंच उरले नाहीयेत. शत्रूंवर सतत पाळत ठेवायची आणि घरट्यात पिल्लांनी केलेली शी वेळच्या वेळी साफ करत रहायचं….एक ना अनेक कामं. पिल्लांच्या मागे दिवस सुरू कधी होतो आणि संपतो कधी कळतच नाही !

पिल्लांना भरवायचा तसा मला कंटाळा नाहीये पण आज गमतीने मी हिला म्हटलं की आपली पिल्लं खूपच खादाड आहेत बुवा! मी म्हटलं नुसतं……तर हिने डोळे वटारले. “उगीच नावं नका ठेवू आपल्या पिल्लांना. वाढत्या वयात भूक जास्तच असते पिल्लांची.  थोडेच दिवस अजून. मग आपल्या आपण खायला शिकतील.”

एकंदरीत काय… आयांना आपल्या पिल्लांवर कोणीही विनोद केलेला अजिबात खपत नाही असं माझ्या लक्षात आलं. पिल्लांच्या बापाने पण केलेला विनोद सुद्धा.

आज आणखी एक गंमत झाली.

आज पिल्लांनी हळू आवाजात चिवचिव करायला सुरुवात केली तशी हिने लगेच जाहीर करून टाकलं की पिल्लांनी तिला हाक मारायला सुरुवात केलीय ! आमच्या भाषेत ‘चि’ म्हणजे आई. सर्वसाधारणपणे पिल्लं जे पहिले आवाज करतात ना ते आवाज आपल्या आईलाच हाक मारणं असतं असा निसर्गातल्या सर्व आयांचा दावा असतो.

मी आता पेंगायला सुरुवात केलीय आणि ही पिल्लांवर पांघरूण घालण्यासाठी घरट्यात जावून बसलीय….

बुलबुल

१४ एप्रिल २०२२.

बुलबुल ची रोजनिशी १३ & १४. Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी १३

आज सकाळी सकाळी कुलकर्ण्यांचा बोका झाडाखाली घुटमळून गेला तर दुपारी कोकिळा. काय क्रूर दिसते ती.

या असल्या शत्रूंवर सतत पाळत ठेवणं भाग होतं. असे कोणी शत्रू घरट्याच्या जवळपास जर फिरकले तर मोठ्या हिमतीने त्यांच्यावर हल्ला करायला लागतो. आकाराने शत्रू कितीही मोठा दिसत असला तरी आम्ही नाही घाबरत कोणाला.

आजचा अख्खा दिवस एकमेकांना सावध ठेवण्यात गेला आणि शिवाय पिल्लांना भरवायचं काम तर होतंच. 

आज आमच्या कामात ही वाढ झाली.‌ पण हे काम सुद्धा आम्ही आळीपाळीने करत राहिलो. 

आता आमची पिल्लं हेच आमचं विश्व. आमचा जणू जीव की प्राण !

बुलबुल

११ एप्रिल २०२२

बुलबुल ची रोजनिशी   १४

आज दिवसभर आळीपाळीने आम्ही दोघेही पिल्लांना भरवत होतो. घरट्याला भोज्या द्यायचा आणि परत पिल्लांसाठी खाऊ गोळा करायला जायचं. सुदैवाने आजूबाजूला खाऊचे खूप अड्डे आहेत. पण तरीही दमछाक नक्कीच होते बरं का.

दिवस सरता सरता मी हिला विचारलं की दिवसभराच्या गडबडीत तू स्वतः दोन घास तरी खाल्लेस का गं ? म्हणाली “हो खाल्ले”. पण तिचे डोळे मात्र वेगळंच काही सांगत होते….

एक बरं आहे. सुदैवाने आमची पिल्लं गुडुप अंधार पडला की पंखाखाली चुपचाप झोपतात. निदान झोप तरी पूर्ण होते.

आणि पिल्लं पण काय छान गोंडस दिसताहेत !

बुलबुल

१२ एप्रिल २०२२.

बुलबुल ची रोजनिशी ११ & १२….Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी   ११

आज मी बाप झालो !!!

आमच्यात आम्ही पिल्लू झाल्यावर तो मुलगा की मुलगी पहातच नाही… मोठं झाल्यावर त्यांना आपोआप कळतंच की आपण कोण आहोत आणि मग ते आपला साथीदार पण बरोबर निवडतात… आणि त्यांची निवड कधीच चुकत नाही. असो.

पिल्लांनी अंड्यातून डोकं बाहेर काढलं न काढलं आणि भुकेने रडायला सुरुवात केली. आमची ही जोपर्यंत अंड्यांची टरफलं घरट्याबाहेर फेकून घरटं साफ करत होती तोपर्यंत माझं पोरांना अन्न भरवायचं काम लगेचच सुरू झालं.

पोरांना घास भरवताना मजा येते. टकाटक खात रहातात. उगीच आपलं एक घास चिऊताईचा  आणि एक घास कावळे दादाचा असा टाईमपास नाही करावं लागत पोरांच्या मागे आम्हाला.

बुलबुल

दिनांक ९ एप्रिल २०२२.

बुलबुल ची रोजनिशी १२

आज बिबुशेट सपत्नीक आम्हाला भेटायला आणि आमच्या पिल्लांना पहायला आले होते. त्यांनी आमच्या पिल्लांचं खूप कौतुक केलं. गप्पांना ऊत आला. मग दोन्ही बायकांनी ‘तुती पार्टी’ करायचा घाट घातला.

अगदी थोड्या वेळासाठी आम्ही चौघेही  जण काकांच्या तुतीच्या झाडावर तुती खायला गेलो. त्यांच्या तुतीची फळं इतकी गोड आहेत की अशी फळं अख्ख्या प्राधिकरणात नाहीत. बिबुशेटने सांगितलं की अख्ख्या प्राधिकरणात ती ‘वर्ल्ड फेमस’ आहेत ! शिवाय काका-काकू दोघेही तुतीची फळं आमच्या साठी राखून ठेवतात.

पार्टी मस्त झाली. 

बिबुशेटची बायको पण काय दिसते म्हणून सांगू…….

बुलबुल

१० एप्रिल २०२२

बुलबुल ची रोजनिशी ९/ बुलबुल ची रोजनिशी १०….. Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ९

गेले दोन दिवस आळीपाळीने मी पण हिच्या बरोबर अंड्यांवर ‘गर्भसंस्कार’ करण्यात सहभाग घेतोय आणि हिला मधून मधून आराम करायला वेळ देतोय.

माणसांमध्ये पुरुष लोक या बाबतीत अगदीच निरुपयोगी दिसतात. पिल्लू होईपर्यंत सगळे बिनकामाचे !

बुलबुल

७ एप्रिल २०२२.

आज सकाळी काका कोणाला तरी कौतुकाने आमचं घर दाखवत होते. ते सांगतच होते तेवढ्यात माझं लक्ष गेलं. माझ्या कडे बोट दाखवून सांगत होते की घरटं ‘त्या लालबुड्या’ बुलबुलचं  आहे. 

बुलबुल ची रोजनिशी १०

काका मला ‘लालबुड्या’  म्हणाले ? यांच्या जिभेला हाड आहे की नाही ?? असले घाणेरडे शब्द वापरून ओळख करून द्यायची ही कुठली पद्धत ???

मला त्या क्षणी एकंदरीतच सगळ्या मनुष्य जाती विषयी घृणा निर्माण झाली. अरे, तुमच्या तुमच्यात एकमेकांना काळं गोरं म्हटलं तर तुम्हाला तो वर्णभेद वाटतो. अपमान वाटतो. आणि ईथे आमचा रंग तर सोडाच आमच्या‌ xxच्या रंगावरून आम्हाला नावं ठेवता ? आम्हा पक्षांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या रंगसंगती वरून आमची ओळख करून देणं हे किती ओंगळवाणं आणि निंदनीय आहे हे यांना कळत कसं नाही ? 

पक्षा-पक्षांमधले इतर फरक तुम्हाला कळत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे.पण म्हणून काय आमच्या ××कडे पहायचं?  आमच्या आमच्यात तर आम्ही एकमेकांनाही सहजच ओळखतो. मला माझी ही आणि बिबूशेटची बायको यात एक नाही दहा फरक सांगता येतील जरी तुम्हाला सारख्या दिसत असल्या तरी….


जावू दे….. बहुतेक माणसांचा मेंदू आम्हा पक्षांपेक्षा छोटा असावा.

बुलबुल

बुलबुल ची रोजनिशी ८….Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ८

गेल्या आठवड्यात बिबुशेटच्या बायकोने म्हणे बुलबुलीमंडळात माता-बालसंगोपनावर लेक्चर दिलं होतं.

आज हिने जेव्हा दुसरं अंडं घातलं तेव्हा मी गमतीने तिला म्हणालो की घरट्यात अजून एका अंड्यासाठी जागा आहे बरं का. तर म्हणते कशी की दोनच पिल्लं पुरे. 

म्हणे आम्ही मंडळात ठराव केलाय छोट्या कुटुंबाचा.

आमचं संभाषण तुम्ही ऐकलं असेल पण तुम्हा माणसांना कशी कळणार आमची भाषा ? म्हणून लिहून ठेवलीत.

मी: दोनच अंडी? दोनच अंडी ??

ती: दोनच अंडी ~

          दोनच अंडी~~

             That Is Trendy~~^^

                 That Is Trendy…~~~~^^^^

बोलता बोलता लाजत लाजत चेकाळून (आणि काहीसं किंचाळत) ती भुर्रकन उडून पण गेली.

(शेजारच्या शर्मांच्या तानिया कडून हे असले इंग्रजी डायलॉग आमची ही शिकत असते).

बुलबुल

दिनांक ६ एप्रिल २०२२

बुलबुल ची रोजनिशी ७….. Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ७

आज मला किती आनंद झालाय काय सांगू तुम्हाला ? आज आमच्या हिने पहिलं अंडं घातलं. शिवाय हिला अजिबात त्रासही झाला नाही की कुणी वैद्याला बोलवावं लागलं. आता मी बाप होणार या कल्पनेनेच मला वेड लागलंय !

आमचं मुलांच्या संगोपनाचं काम पण लगेच सुरू झालं. आम्हाला हवेत उडताना कसंही वेडंवाकडं उडावं लागतं. अशा वेळी चक्कर यायची खूप भिती असते (आमच्या शेजारच्या काकूंना तर आठ दिवस धडपणे चालता सुद्धा येत नव्हतं मध्यंतरी). तेव्हा आमच्या पिल्लांच्या vestibular apparatus ला गर्भात असतानाच अशा गोल गोल गिरक्यांची सवय व्हावी म्हणून आम्ही अंडं सतत गोल गोल फिरवत रहातो. आता या‌ कृतीला काही तज्ञांनी ‘गर्भसंस्कार’ नाव देऊन व्यवसाय सुरू केलेला पाहिलं की हसू येतं. मला कळत नाही की आपल्या पिल्लांनी जे जन्मानंतर करायला पाहिजे ते आईने बाळ गर्भात असतानाच करायला पाहिजे यात कुठलं क्लिष्ट तंत्रज्ञान आहे ?

आज काकांना दम भरला. त्यांनी चूक तर मान्य केलीच शिवाय शक्य असेल तेव्हा तेव्हा शेजारच्या जाधवांच्या बोक्याला हुसकावून लावण्याचं पण मान्य केलं. त्यामुळे त्यांना लांबून (पण फ्लॅश विरहित) फोटो काढायची परवानगी आम्ही दिली आहे.

बुलबुल

बुलबुल ची रोजनिशी ६……Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ६

आज एक नवीनच संकट निर्माण झालं. 

सकाळी आमची ही घर रुळण्यासाठी घरट्यात शांत बसली होती‌ आणि अचानकपणे तिच्या डोळ्यावर झगमगाट झाल्यासारखं झालं. क्षणभर ती घाबरली. पण  दोन मिनिटांनी तिने किलकिल्या डोळ्यांनी पाहिलं तर शेजारचे काका निर्लज्ज पणे आमच्या हिचे फोटो काढत होते. 

तिच्या अंगाचा तिळपापड तर झालाच पण मला समजलं तेव्हा मला पण चीड आली. 

आमच्या “प्रायव्हसीचं” यांना काहीच कसं वाटतं नाही ? अजून तर हिची डिलीव्हरी पण व्हायची आहे. 

आपल्या पिल्लांचे फोटो त्यांनी व्हायरल केले तर ? एक ना अनेक शंका मनात दाटून आल्या.

नशीब आमची ही काल मला आंब्याच्या झाडाच्या गर्द झाडीत घेऊन गेली…… नाहीतर यांनी आमचे कसले कसले फोटो असते.

असो. उद्या काकांना समज द्यावी लागेल असं दिसतंय….

बुलबुल

दिनांक ४ एप्रिल २०२२

बुलबुल ची रोजनिशी ५……Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ५

कालच्या रोमांचक अनुभवाची नशा एवढी होती की आज संध्याकाळपर्यंत घर जवळजवळ पूर्ण बांधून पण झालं. आमचं घर ना 1 BHC … आहे. म्हणजे ” एक बुलबुल (फॅमिली) होल्डिंग कपॅसिटी” आहे. मस्त अर्धगोलाकार आहे… आणि अख्खं घर कव्हर्ड आहे. आणि ही म्हणाली की आपल्या पिल्लांना नक्की पुरून उरेल. 

आणखी एक गंमत सांगण्यासारखी आहे. तसं तर घर all spice च्या फांदीवरच आहे आणि बिबुशेटने काहितरी “पोरांच्या इम्युनिटी साठी पुरक आहे” असं पण सांगितलं होतं. पण हिची दूरदृष्टी बघा….. म्हणाली शेजारच्या काकूंनी फोडणी घातली की इथे आपल्याला ठसका लागतो तर आपल्या पोरांचं काय ? कुठूनतरी शोधुन एक वाळलेली वेगळीच दिसणारी काडी आणून घरट्याला खोचून ठेवली. मी म्हटलं हे काय ? तर म्हणाली तुळशीची मंजिरी आहे. खोकल्यावर रामबाण ! तुम्हाला सांगतो आमच्या हिचं संसाराचं ज्ञान वाखाणण्याजोगं आहे.

असो. तर आमचं घर फक्त तीन दिवसातच बांधून झालं. पण मी पाहिलंय शेजारचे कुलकर्णी तीन वर्ष घर बांधत होते….. मला एक प्रश्न पडतो की माणसं आपल्या एक आणि दोन पिल्लांसाठी एव्हडी मोठ्ठी घरं कशासाठी बांधतात ?

बुलबुल

दिनांक ३ एप्रिल २०२२.

%d bloggers like this: