बुलबुल ची रोजनिशी २
आज सकाळी माझ्या एका अनुभवी मित्राला जागा दाखवायला घेऊन गेलो. त्याचं टोपणनाव ‘बिबुशेठ’. त्याचा तुरा आम्हा सर्वांमध्ये मोठा. त्याने आत्तापर्यंत तीन चार घरं बांधली म्हणतात. शिवाय दोघी तिघी बुलबुलींबरोबर संसार पण केलाय! त्याचा ‘हा’ अनुभव जास्त महत्वाचा होता.
प्लॉट ‘अॉल स्पाइस’ झाडावर आहे हे पाहून तो खूप खुश झाला. वातावरणात मसाल्याचा मस्त वास होता. जोरात श्वास घेत म्हणाला ‘झाडाच्या पानांच्या मसाल्याच्या वासाने पोरांची इम्युनिटी मजबूत होईल बघ’. मी कसंबसं सावरत म्हणालो “बिबुशेठ… मसाल्याचा वास शेजारच्या काकूंनी घातलेल्या फोडणीचा आहे.”

पण बिबुशेठने मान वाकडी करून असहमती दाखवली.
असो. मी म्हटलं ते सोड, बायकोला उन्हात पोरं काळी व्हायची चिंता आहे. तू माझ्या बायकोचं मन वळवशील का ?
बिबुशेठ किंचाळत म्हणाला… बायकोचं ? आणि मन वळवायचं ??? यडा झाला का काय?????
खूप वेळ वेडी वाकडी मान करत राहिला. तो गंभीर झाला की असंच करतो. थोड्या वेळाने मग एकदम चित्कारत म्हणाला ” बायकोचं मन वळवण्यापेक्षा तू त्या केळीचं पान का नाही वळवत? छान सावली होईल”……..
प्रयत्न करायला काहिच हरकत नव्हती.
पान वाकवणं सोपं नव्हतं. मान वाकडी करून करून मोडायची वेळ आली. पण बायकोवर छाप तर पाडायची होती ना? मनात म्हटलं…हम भी कुछ कम नहीं ! (आमच्यात हिंदी भाषा वापरण्याची क्रेझ आहे बरं का. माझ्या माहितीप्रमाणे हिंदी चित्रपटांमध्ये आमच्यावर लिहिलेली कित्येक गाणी खूप गाजली आहेत !)
(पुढचा मजकूर पुढच्या फोटो नंतर)